43.6 अंश सेल्सिअस
चंद्रपूर,
मागील तीन दिवसांपासून Chandrapur Temperature चंद्रपूर जिल्हा अक्षरशः पेटत आहे. महानगराच्या तापमानातही कमालीची वाढ झाली असून, शुक्रवार, 17 एप्रिल रोजी तापमान तब्बल 43.6 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. तर जिल्ह्यातील ब्रम्हपूरी शहरातही तप्त झळा असह्य होत आहे. तेथे 43 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. येथील पारा 43 अंशावर पोहाचला आहे. विदर्भातही उष्णतेची तीव्र लाट आहे. शुक्रवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांच्या तापमानाने चाळिशी ओलांडली आहे. अकोला, गडचिरोली, नागपूर, वर्धाचे तापमान 44 अंशांपेक्षा अधिक नोंदवले गेले. अकोला 44.1, नागपूर 44, वर्धा 44.4, गडचिरोली 44, यवतमाळ 42.8, गोंदिया 42.9, तर बुलढाणा येथे 41.2 अंश सेल्सिअस एवढ्या तापमानाची नोंद झाली आहे.
Chandrapur Temperature शुक्रवारी चंद्रपुरात सकाळपासूनच तीव्र उन्हाचे चटके जाणवत आहे. दिवसभर वाहणार्या उष्ण वार्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या तापमानामुळे दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. आगामी काळातदेखील अशाच पद्धतीने चढते तापमान राहण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. उकाड्यापासून बचाव करण्यासाठी नागरिकांकडून वातानुकूलित यंत्रणेसह पंखे, कुलर्सचा वापर केला जात आहे. मात्र, या तापमानामुळे घरातील कुलर्सदेखील थंडावा देईनासे झाले असून, पाणीटंचाईची परिस्थिती भीषण होत चालली आहे. उष्णतेमुळे अनेक बांधकाम, शेतीच्या कामावर विपरित परिणाम होत असून, आरोग्यासाठीही वाढते तापमान हाणीकारक आहे.