जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कवठा, गोठणगाव परिसरात धुमाकूळ घालणार्या Wild elephants रानटी हत्तींचा कळप मिळेल त्या दिशेने आपला मोर्चा वळवित आहेत. अशात एका गजराजने बुधवारी १५ एप्रिल रोजी चक्क प्रतापगड-नवेगावबांध मार्गावर गस्तीवर असलेल्या वन अधिकारी, कर्मचार्यांचाच रस्ता रोखून धरत नाकाबंदी केल्याचे दिसून आले. दरम्यान, या घटनेचा व्हिडीओ प्रसार माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला असून काही मिनिटांसाठी वन अधिकार्यांना रोखून धरल्यानंतर सदर हत्ती जंगलाच्या दिशेने निघून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणने आहे.
महिनाभरापूर्वी गडचिरोली जिल्ह्यातून गोंदिया जिल्ह्यात दाखल झालेल्या Wild elephants रानटी हत्तींनी जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यात चांगलाच धुमाकूळ घातला आहे. शेकडो एकरातील मका व इतर पिकाला पायाखाली तुडवत त्याचबरोबर शेतातील साहित्यांची नासधूस करत या हत्तींचा कळप मिळेल त्या मार्गाने भ्रमण करत आहे. त्यामुळे शेतकर्यांना प्रचंड नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे या हत्तींना हाकलून लावण्यात वन विभाग व संबंधित पथक अपयशी ठरत असल्याने वन विभागालाही घाम फुटला आहे. या हत्तींवर नजर ठेवण्यासाठी वन विभागातर्फे बाधित भागात गस्त वाढविण्यात आली असून वन अधिकार्यांकडून वेळोवेळी या भागाला भेटी दिल्या जात आहेत. या अनुषंगाने नवेगावबांधचे सहाय्यक वनसंरक्षक अविनाश मेश्राम व त्यांची चमू बुधवारी दुपारनंतर गस्तीवर असताना अचानक एक हत्ती रस्त्यावर आला. त्याने काही वेळापर्यंत रस्ता रोखून धरला. व यानंतर तो हत्ती जंगलाच्या दिशेने निघून गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत असून जिल्ह्यात आता सर्वत्र या हत्तींच्या चर्चा रंगू लागल्या आहे.