आश्रम शाळा प्रवेशद्वारासमोर गतिरोधक बसवण्याच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

स्थानिकाचा आंदोलनाचा इशारा

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
मानोरा,
ashram school तालुक्यातील तीर्थक्षेत्र वाई गौळ (अमरगड) ह्या गावाच्या सीमेवर असलेल्या तपस्वी संत श्री काशिनाथ महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा तथा देवस्थानाच्या मध्यभागातून निर्माण करण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक सुसाट वाहतुकीला लगाम घालून विद्यार्थी, श्रद्धाळू व नागरिकांचे संभाव्य अपघात टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आलेल्या लेखी मागणीची दखल घेण्यात न आल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा गोपाल महाराज (राठोड) यांच्या वतीने जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे.
 
 
ashram school
 
 
वाई गौळ येथील तपस्वी संत श्री काशिनाथ बाबा आश्रम शाळेत परिसरातील विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेचे प्रवेशद्वार थेट राष्ट्रीय महामार्गाला लागून आहे. महामार्गाचे काम झाल्यापासून या मार्गावर अवजड वाहने, ट्रक आणि खासगी वाहने सुसाट वेगाने धावतात. शाळा सुटल्यावर विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडताना मोठा धोका निर्माण होतो. दर्शनासाठी मंदिरात दररोज असंख्य भक्त मंडळी सुद्धा येत असतात व येथे धार्मिक व इतर कार्यक्रम नेहमी होत असल्याने वर्दळ असते. येथे कोणतेही गतिरोधक, वेगमर्यादेचे फलक किंवा झेब्रा क्रॉसिंग नसल्याने अपघाताचा धोका कायम आहे.

शाळेच्या प्रवेशद्वारासमोर दोन्ही बाजूंना शास्त्रोक्त पद्धतीचे गतिरोधक बसवावेत.शाळा क्षेत्र, वेगमर्यादा २० किमी असे सूचनाफलक लावावेत व विद्यार्थ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे मारावेत. या मागणीसाठी स्थानिक गोपाल महाराज (राठोड) यांनी यापूर्वी प्रशासनाकडे निवेदने दिली. मात्र दोन आठवडे उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. प्रशासनाने आठ दिवसांत गतिरोधक बसवण्याचे काम सुरू न केल्यास शाळेतील विद्यार्थी, पालक व भाविकांना सोबत घेऊन महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गोपाल दिला आहे.