AI देणार भिल्ल-कोरकू बोलींना ‘डिजिटल श्वास’

भाषांचा हरवलेला सूर पुन्हा गुंजणार

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
मुंबई
AI Bhil language महाराष्ट्रातील लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या भिल्ल आणि कोरकू यांसारख्या आदिवासी बोलीभाषांना आता कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल स्वरूपात जपण्याचे प्रयत्न वेगाने सुरू झाले आहेत. या भाषांचे डिजिटल पुनरुज्जीवन, दस्तऐवजीकरण आणि भाषांतरासाठी लार्ज लॅंगवेज मॉडेल (LLM) आधारित प्रणाली विकसित केली जात असून, भाषाशास्त्र आणि तंत्रज्ञान क्षेत्रात हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
 

AI Bhil language preservation, Korku language digitalization 
‘AI’ च्या साहाय्याने या भाषांना डिजिटल जगात स्थान मिळावे आणि पुढील पिढ्यांपर्यंत त्यांचा वारसा पोहोचावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. भिल्ल आणि कोरकू या महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी बोलीभाषा असून त्या बहुतांश वेळा केवळ मौखिक परंपरेवर अवलंबून आहेत. त्यामुळे डिजिटल माध्यमांमध्ये त्यांचे अस्तित्व अत्यंत मर्यादित आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य पातळीवर ‘आदि वाणी’सारखे AI-आधारित प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आले आहेत, जे आदिवासी भाषांचे भाषांतर, ध्वनी-आधारित (speech-to-text) आणि मजकूर-आधारित (text-to-speech) सुविधा उपलब्ध करून देतात. या उपक्रमांमध्ये स्थानिक समुदायांचा सहभाग घेऊन भाषेचा डेटा संकलित केला जात आहे. तज्ज्ञांच्या मदतीने 'मानवी सहभाग’ प्रणालीद्वारे AI तयार केलेल्या भाषांतरांची पडताळणीही केली जात आहे.
 
 
भाषाशास्त्रज्ञांच्या मते, AI Bhil language  अशा कमी-डेटा भाषांसाठी सर्वात मोठे आव्हान म्हणजे उपलब्ध लिखित साहित्याचा अभाव. त्यामुळे AI मॉडेल्सना शिकवण्यासाठी आवश्यक डेटा मर्यादित प्रमाणात उपलब्ध होतो. ही उणीव भरून काढण्यासाठी समुदाय-आधारित डेटा संकलन, लोककथा, गाणी आणि संवादांचे रेकॉर्डिंग करून मोठे भाषिक डेटासेट तयार केले जात आहेत.ताज्या संशोधनानुसार भिल्ल भाषेसाठी हिंदी आणि इंग्रजीशी जोडणारे हजारो वाक्यांचे डेटासेट तयार करण्यात आले असून, मशीन ट्रान्सलेशन प्रणाली अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. यामुळे शिक्षण, प्रशासन आणि माहिती प्रसारण यांसारख्या क्षेत्रांमध्ये स्थानिक भाषांचा वापर सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
.
या उपक्रमांमुळे आदिवासी भाषांचे केवळ जतनच नाही तर त्या भाषांना डिजिटल अर्थव्यवस्था, शिक्षण व्यवस्था आणि शासकीय सेवांमध्ये स्थान मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, भिल्ल आणि कोरकू यांसारख्या बोलीभाषांना नव्या युगात ‘डिजिटल ओळख’ मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.