- स्थानिक गुन्हे शाखा पथकाची कारवाई
- २.१० लाखाचा मुद्देमाल जप्त
गोंदिया,
Bike thief गोंदिया जिल्ह्यासह नागपूर शहरातून दुचाकी चोरणार्या दोन अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखाच्या पथकाने गुरुवार १६ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास सापळा कारवाई करून अटक केली. या चोरट्यांच्या ताब्यातून २ लाख १० हजार रुपये किमतीच्या चोरी केलेल्या ३ दुचाक्या जप्त करण्यात आल्या आहे. धीरज भूषण फुंडे (३५) रा. कालीमाटी, तेजराम उर्फ तेजस जगदीश आडे (३०) रा. कोंढा कोसारा, ता. पवनी जि. भंडारा असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
Bike thief मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखाचे पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांच्या मार्गदर्शनात पथकाकडून जिल्हा हद्दीत दुचाकी चोरट्यांचा शोध व गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग सुरु असताना आरोपी धीरज फुंडे व त्याचा मित्र आरोपी तेजराम उर्फ तेजस या दोघांनी गोंदिया जिल्ह्यासह नागपूर येथून दुचाकी चोरी करून सदर दुचाकीची विक्री करण्यासाठी गोंदिया येथे येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. या आधारे स्थानिक गुन्हे शाखा पथकाने गुरुवारी सायंकाळी कुडवा परिसरात सापळा कारवाई केली. ज्यामध्ये दोन्ही आरोपींना ताब्यात घेत दुचाकी चोरीच्या संबंधाने सखोल विचारपूस केली असता दोघांनी मिळून आमगाव येथून २ , गोंदिया रेल्वे स्थानक परिसरातून १ व नागपूर येथील प्रतापनगर परिसरातून १ दुचाकी चोरी केल्याचे काबुल केले. यावेळी त्यांच्या ताब्यातून चोरी केलेल्या तीन वेगवेगळ्या किमतीच्या ३ दुचाकी किमत २ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर दुचाकीबाबत गुन्हे अभिलेख तपासण्यात आले असता हे गोंदिया जिल्ह्यातील आमगाव व गोंदिया शहर पोलिस ठाणे हद्दीतील ३ गुन्हे, व नागपूर जिल्ह्यातील १ गुन्हा असे एकूण ४ गुन्हे उघडकीस आले. आरोपींनी एक दुचाकी छत्तीसगड राज्यातील कवर्धा येथे लपवून ठेवली असून ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दोन्ही आरोपींना पुढील कारवाईसाठी गोंदिया शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
...