पुलगाव,
सहकार मंत्रालयाने Daily Deposit Agents' Commissions दैनिक ठेव अभिकर्त्यांच्या कमिशनमध्ये अर्ध्या टक्याची कपात करण्याचा घेतलेल्या निर्णयाचे पडसाद उमटू लागले आहेत. शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुलगाव शहरातील सर्व पतसंस्थांच्या अभिकर्त्यांची मातृसेवा सभागृहात बैठक पार पडली. यावेळी शासनाने हा निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या ३० वर्षांपासून अनेक अभिकर्ते तुटपुंज्या कमिशनवर पतसंस्थांसाठी कष्ट करत आहेत. पतसंस्थांना आर्थिक बळकटी देण्यात अभिकर्त्यांचा मोठा वाटा असतो. दैनंदिन ठेवींसोबतच हे अभिकर्ते मुदत ठेवी आणि मासिक ठेवीही संस्थेत आणतात. विशेष म्हणजे, केवळ दैनिक ठेवीवरच त्यांना कमिशन मिळत होते, इतर ठेवींवर एक रुपयाही मोबदला मिळत नसतानाही आजवर कोणी तक्रार केली नव्हती. मात्र, आता जो हक्काचा परतावा मिळत होता, त्यातही कपात केल्याने अभिकर्त्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. पतसंस्थेतील प्रत्येक कर्मचार्याला दरवर्षी पगारवाढ मिळते. त्यांना महागाई भत्ता दिला जातो. मात्र, आम्ही साडेतीन दशकांपासून केवळ ३ टक्के कमिशनवर काम करत आहोत. महागाई वाढत असताना कमिशन वाढवण्याऐवजी अर्धा टक्का कपात करण्याचा अन्यायकारक निर्णय घेतला आहे.
Daily Deposit Agents' Commissions सहकार खात्याने परिपत्रक काढून दैनिक ठेव अभिकर्त्यांचे कमिशन ३ टक्क्यांवरून २.५ टक्के करण्याचा आदेश दिला आहे. मे महिन्यापासून ही कपात लागू होणार आहे. सहकार मंत्र्यांनी या निर्णयाचा फेरविचार करून कपातीचा आदेश तात्काळ मागे घ्यावा. तसेच अभिकर्त्यांचा टी.डी.एस. हा संस्था स्तरावरून कापण्यात यावा, आदी मागण्या करण्यात आल्या. जर सरकारने आमचा आवाज ऐकला नाही तर पुलगावमधील आजूबाजूच्या गावातील ३५० हून अधिक अभिकर्ते प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर उतरतील, असा इशारा यावेळी देण्यात आला.