‘हापूस’चा सुगंध दरांचा चढता आलेख ठरतोय

दर 1200 पर्यंत, ग्राहकांची झुंबड कायम

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
पुणे,
Hapus mango price  चाकण कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या रत्नागिरी व देवगड येथील प्रसिद्ध हापूस आंब्यांची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली असून, उत्पादनात घट होऊनही बाजारभाव तेजीत कायम असल्याचे चित्र दिसत आहे. यंदाच्या हंगामात हापूस आंब्यांचे दर प्रति डझन 800 ते 1200 रुपयांदरम्यान स्थिरावले असून, दर्जेदार फळांना ग्राहकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
 

Hapus mango price  
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंबा खरेदीला विशेष महत्त्व असल्याने मागील काही दिवसांपासून बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. हापूससोबतच लालबाग, केशर, बदाम आणि दशेरी यांसारख्या विविध आंब्यांच्या जातीही बाजारात मोठ्या प्रमाणावर दाखल झाल्या असून, संपूर्ण फळबाजार गजबजलेला दिसत आहे.
यंदा हवामानातील अनिश्चिततेचा Hapus mango price  आंबा उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. फुलोऱ्याच्या काळात झालेला अवेळी पाऊस, त्यानंतर वाढलेले तापमान आणि आर्द्रतेतील चढउतार यामुळे झाडांवरील फळधारणेवर विपरीत परिणाम झाला. अनेक भागांमध्ये फळधारणा कमी झाल्याचे तसेच काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फळगळ झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. परिणामी, मागील वर्षांच्या तुलनेत यंदा आंबा उत्पादनात लक्षणीय घट झाल्याचे चित्र आहे.दरम्यान, पूर्वी मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात होणारा हापूस आंबा यंदा विविध कारणांमुळे देशांतर्गत बाजारपेठेतच अधिक प्रमाणात उपलब्ध होत आहे. काही देशांनी घातलेल्या निर्बंधांमुळे निर्यात कमी झाली असून, त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेतील पुरवठा आणि स्पर्धेवर झाला आहे. मात्र उत्पादन घटल्यामुळे दरांवर फारसा दबाव जाणवत नसल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.व्यापाऱ्यांच्या मते, आंब्याच्या गुणवत्तेनुसार दरांमध्ये मोठा फरक दिसून येत आहे. आकर्षक रंग, सुगंध आणि चव असलेल्या देवगड व रत्नागिरी हापूसला ग्राहकांची विशेष पसंती मिळत आहे. दर्जेदार आंब्यासाठी ग्राहक अधिक दर मोजण्यास तयार असल्याचेही बाजारातील चित्र आहे.
या संदर्भात आंबा व्यापारी शहजाद बागवान यांनी सांगितले की, यंदा उत्पादनात घट झाल्यामुळे दर टिकून आहेत. ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून गुणवत्तेनुसारच विक्री होत आहे. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा बाजारभाव अधिक असल्याचे त्यांनी नमूद केले.
आगामी काही आठवड्यांत आंब्यांची आवक आणखी वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे. मात्र एकूण उत्पादनाची स्थिती आणि निर्यातीतील बदल यावरच पुढील काळातील बाजारभावांचा कल अवलंबून राहणार असल्याचेही स्पष्ट होत आहे. सध्या तरी चाकण बाजार समितीत हापूस आंब्यांच्या गोडीने आणि ग्राहकांच्या गर्दीने बाजारपेठ उत्साही वातावरणात बहरली आहे.