पुणे,
Hapus mango scam अनेक शहरातील मुख्य बाजारपेठेत आंब्यांचा हंगाम सुरू होताच एक गंभीर प्रकार समोर येत आहे. ‘हापूस’ आंब्याच्या नावाखाली ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे उघड झाले आहे. बाजारात विक्रीस ठेवलेले आंबे ‘हापूस’ म्हणून सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात ते कर्नाटकातून आणलेले असल्याची माहिती पुढे आली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी काही विक्रेते हापूस या नावाचा वापर करत असून, त्याद्वारे जादा दर आकारले जात आहेत. सध्या बाजारात आंब्यांना मोठी मागणी असून पुरवठा तुलनेने कमी आहे. विशेषतः अलिबाग परिसरातून येणाऱ्या खऱ्या हापूस आंब्यांची आवक अद्याप मर्यादित असल्याने त्यांचे दर आधीच वाढले आहेत.
या परिस्थितीचा फायदा घेत काही विक्रेते बाहेरील आंबे हापूस म्हणून विक्रीस आणत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ग्राहक ७०० ते ८०० रुपयांपर्यंत दर देऊन आंबे खरेदी करत आहेत, परंतु त्यांना अपेक्षित दर्जा मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.आंब्यांच्या जातीची ओळख पटवणे सर्वसामान्य ग्राहकांसाठी अवघड ठरत असल्यामुळे अनेक जण नकळत फसवले जात आहेत. या प्रकारामुळे प्रामाणिक विक्रेत्यांनाही तोटा सहन करावा लागत असून बाजारातील विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. या गैरप्रकारावर तातडीने अंकुश आणण्याची मागणी ग्राहकांकडून जोर धरत आहे. अन्न व औषध प्रशासन तसेच बाजार समितीने याकडे गांभीर्याने लक्ष देत तपासणी मोहीम राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच, विक्रीस ठेवलेल्या आंब्यांचा उगम स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक करावे, अशीही मागणी पुढे येत आहे.