इंडोनेशिया,
helicopter-crashes : बोर्नियो बेट येथे एक मोठा हेलिकॉप्टर अपघात घडला असून, या दुर्घटनेत आठही जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना पाम ऑइल प्लांटेशनदरम्यान उड्डाण करणाऱ्या हेलिकॉप्टरच्या कोसळल्यामुळे घडली.
एअरबस एच130 मॉडेलचे हे हेलिकॉप्टर पीटी मॅथ्यू एअर नुसंतारा या कंपनीचे होते. गुरुवारी वेस्ट कालिमंतान प्रांतातील मेलावी जिल्ह्यातून या हेलिकॉप्टरने उड्डाण केले होते. ते कुबू राया जिल्ह्यातील दुसऱ्या प्लांटेशनकडे जात होते. मात्र उड्डाण केल्यानंतर अवघ्या पाच मिनिटांतच हेलिकॉप्टरचा संपर्क तुटला आणि काही वेळातच ते कोसळल्याची माहिती समोर आली.
यानंतर शोध आणि बचाव पथकांनी मोठी मोहीम हाती घेतली. अखेर सेकाडाऊ जिल्ह्यातील दाट जंगलामध्ये हेलिकॉप्टरचा अवशेष सापडला. घटनास्थळी पोहोचलेल्या पथकाने दोन कर्मचारी आणि सहा प्रवासी अशा एकूण आठ जणांचे मृतदेह बाहेर काढले. मृतांमध्ये एका मलेशियन नागरिकाचाही समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
इंडोनेशिया हा सुमारे २७ कोटी लोकसंख्या असलेला मोठा द्वीपसमूह देश आहे. येथे भौगोलिक परिस्थितीमुळे हवाई आणि जलवाहतुकीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहावे लागते. मात्र याच कारणामुळे विमान, हेलिकॉप्टर आणि फेरीबोट अपघातांच्या घटना अधूनमधून घडत असतात.