हिंगणघाट,
hunger strike for water तालुक्यातील पिंपळगाव (माथनकर) गट ग्रामपंचायतीअंतर्गत येणार्या कुंभी येथे पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणी समस्या सोडवण्यात यावी या मागणीसाठी प्रतीक झाडे यांच्या नेतृत्वात १६ रोजीपासुन ग्रामपंचायतीपुढे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे.

वर्धा जिल्ह्यात सध्या उष्माघाताचा इशारा देण्यात आला असून हिंगणघाट परिसरात तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. प्रचंड उष्णतेतही कुंभी गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी दररोज भटकंती करावी लागत आहे. परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चालली आहे. गावात २०२३ साली जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, निधीअभावी ही योजना अपूर्ण आहे. परिणामी, गावकर्यांना आजपर्यंत नियमित व शाश्वत पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध झालेली नाही. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पृष्ठभूमीवर प्रतीक झाडे यांच्या नेतृत्वात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. जोपर्यंत गावात नियमित पाणीपुरवठ्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. या आंदोलनाला गावकर्यांचा पाठींबा मिळत आहे.
आंदोलनात शांताराम थोटे, अमोल खमाट, वैशाली काटकर, नितीन जुमघरे, संगीता ताकसांडे, वैभव खडतकर, गजानन थुल, उमेश काकडे, यशोधरा जुनघरे, पौर्णिमा जवादे, रेखा जवादे आदीसह गावातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.hunger strike for water उपोषणाची माहिती मिळताच हिंगणघाट पंचायत समितीचे ब्लॉक विकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले.