मुंबई,
information regarding 10th-12th results महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांचे निकाल लवकरच जाहीर होणार असून विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. सध्या मंडळाकडून अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी उपलब्ध माहितीनुसार बारावीचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, तर दहावीचा निकाल मे अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीस लागण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनुसार बारावीची परीक्षा दहा फेब्रुवारी ते अकरा मार्च २०२६ या कालावधीत पार पडली होती, तर दहावीची परीक्षा वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च २०२६ दरम्यान घेण्यात आली होती. वर्षभराच्या अभ्यासानंतर आता विद्यार्थ्यांचे लक्ष निकालाकडे लागले असून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी हा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळांवर तो पाहू शकतात. यामध्ये महाराष्ट्र राज्य मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ, बारावी आणि दहावी परीक्षांसाठी स्वतंत्र संकेतस्थळे तसेच शासकीय निकाल संकेतस्थळ यांचा समावेश आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना आपला आसन क्रमांक आणि आईचे नाव प्रविष्ट करावे लागणार असून निकाल स्क्रीनवर दिसल्यानंतर तो डाउनलोड किंवा प्रिंट करता येईल.
सध्या उपलब्ध माहिती आणि मागील वर्षांच्या निकालाच्या कलानुसार बारावीचा निकाल साधारणपणे मेच्या मध्यापर्यंत जाहीर होण्याची शक्यता असते, तर दहावीचा निकाल त्यानंतर काही दिवसांनी जाहीर केला जातो. मागील वर्षीही निकाल मे महिन्याच्या अखेरीस जाहीर करण्यात आला होता, त्यामुळे यंदाही त्याच कालावधीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.