भीषण अपघात : 6 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
कोल्हापूर
Karnataka bus car accident समृद्धी महामार्गावरील भीषण अपघाताची घटना ताजी असतानाच कर्नाटकात आणखी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. कर्नाटकातील यादगीर जिल्ह्यात खासगी प्रवासी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण धडकेत बसला आग लागून सहा प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
 

Karnataka bus car accident Yadgir, 
ही दुर्घटना यादगीर जिल्ह्यातील सुरपूर तालुक्यातील शांतगिरी क्रॉस येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, खासगी आरामदायी बस बंगळुरूहून कलबुर्गीकडे निघाली होती, तर समोरून येणारी कार विरुद्ध दिशेने प्रवास करत होती. भरधाव वेगात असलेल्या कारने बसला जोरदार धडक दिल्यानंतर बसने तत्काळ पेट घेतला आणि काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले.
आग लागल्यानंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी प्रवासी हाताला मिळेल ते सामान घेऊन बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागले. अनेकांना वेळेत बाहेर पडण्यात यश आले, मात्र सहा प्रवासी आगीत अडकून पडले आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील सदस्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली असून ते देवदर्शन करून परत येत होते.अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, तोपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झाली होती. या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.दरम्यान, कार ओव्हरटेक करत असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती यादगीरचे पोलीस अधीक्षक पृथ्वीक शंकर यांनी दिली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू असून, अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.