नवी दिल्ली,
Kher reprimanded by the court काँग्रेस नेते पवन खेरा यांना सर्वोच्च न्यायालयातून कोणताही दिलासा मिळाला नसून न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन वाढवण्याचा अर्ज फेटाळून लावला आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने स्पष्ट केले की, आसाममधील न्यायालयात दाखल होणाऱ्या याचिकेवर यापूर्वी दिलेल्या आदेशांचा किंवा इतर न्यायालयांच्या निरीक्षणांचा कोणताही परिणाम होणार नाही. तसेच खेरा यांनी तात्काळ आसाममध्ये जाऊन अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करावा, असेही न्यायालयाने निर्देश दिले. या प्रकरणातील सुनावणीत खेरा यांच्यावतीने बाजू मांडणारे वरिष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी अंतरिम जामीन वाढवण्याची मागणी केली. मात्र, यावर आक्षेप घेत सरकारी बाजूने तुषार मेहता यांनी याचिकेला विरोध दर्शवला. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने खेरा यांना दिलासा देण्यास नकार दिला.
गंभीर प्रकाराला साधी चूक कशी म्हणता
सुनावणीदरम्यान न्यायालयाने खेरा यांच्या बाजूने सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. काही कागदपत्रे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असल्याचे नमूद करत न्यायालयाने यावर कठोर शब्दांत टीका केली. अशा प्रकारची कागदपत्रे सादर करणे ग्राह्य धरता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने संबंधित मुद्द्यावर कठोर भूमिका घेतली.दरम्यान, खेरा यांच्या वकिलांनी ही चूक अनवधानाने झाल्याचे सांगत माफी मागितली आणि योग्य कागदपत्रे नंतर सादर केल्याचे न्यायालयाला कळवले. तरीही न्यायालयाने याला किरकोळ बाब मानण्यास नकार दिला. न्यायालयाने विचारले की, अशा गंभीर प्रकाराला साधी चूक कशी म्हणता येईल.
सुनावणीच्या शेवटी न्यायालयाने खेरा यांना आसाममधील संबंधित न्यायालयात अर्ज दाखल करण्याचे निर्देश दिले आणि त्यावर तातडीने सुनावणी होईल, असे स्पष्ट केले. तसेच सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या निरीक्षणांचा त्या सुनावणीवर परिणाम होणार नाही, असेही नमूद करण्यात आले. या निर्णयामुळे खेरा यांना सलग दुसऱ्यांदा न्यायालयातून दिलासा न मिळाल्याने त्यांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.