महात्मा फुले हे जागतिक विचारांची पायाभरणी करणारे पहिले समाजसुधारक : प्रा. अशोक राणा

क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले जयंती महोत्सवाचा समारोप

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
वाशीम,
prof ashok rana समाजाला जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल तर जागतिक विचार सुद्धा आत्मसात करावे लागतील. ही बाब हेरून क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांनी जागतिक विचार आत्मसात करत ते भारतात रुजविण्याचे कार्य केले. त्यांनी सत्यशोधनाचा नवा विचार पेरून पिढ्यान, पिढ्याच्या गुलामगिरीतुन बहुजन समाजाची सुटका केली, असे गौरवोद्गार प्रा. अशोक राणा यांनी काढले.
 
 
महात्मा फुले हे जागतिक विचारांची पायाभरणी
 
 
क्रांतीसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या जयंती व द्विशताब्दी जन्मोत्सवी वर्षानिमित्त क्रांतीसुर्य सार्वजनिक जयंती उत्सवसमितीच्या वतीने फुले स्मारक परिसरात ११ एप्रिल रोजी आयोजित जाहीर व्याख्यानात प्रा. राणा यांनी सविस्तर मांडणी केली. यावेळी विचारपीठावर ज्येष्ठ सत्यशोधक विचारवंत डॉ. रवी जाधव, रामप्रभू सोनोने, डॉ. विजय कानडे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण इंगोले, प्रल्हाद रंधवे, लिलाबाई रंधवे यांची उपस्थिती होती.
 
यावेळी पुढे बोलताना प्रा. राणा म्हणाले की, जोतीराव फुले यांना बालपणापासूनच शिक्षणाची आवड असल्यामुळे त्यांचे विचार अधिक प्रगल्भ झाले. त्यांनी जगातील सर्व आदर्शत्वांचा अभ्यास केला आणि हा जागतिक विचार आपल्या देशात रुजविण्यासाठी त्यांनी आयुष्यभर कार्य केले. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना करून सत्यशोधनाचा नवा विचार रुजविला. विचारांची शक्ती ही सर्वाधिक प्रबळ असते, त्यामुळे विचारांची पिढी घडविण्याचे काम त्यांनी केले. ते देशातील एक मोठे उद्योगपती होते. त्यांनी आपला वेळ, श्रम आणि पैसा समाजाच्या उत्थानासाठी खर्ची घातला.prof ashok rana  त्यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह काढले. स्त्रियांसाठी अनेक शाळा काढल्या. गुलामगिरी या ग्रंथातून त्यांनी समाजाच्या अधोगतीचे कारण मांडले. महात्मा फुले यांच्या जीवनातील विविध प्रसंगांची उदाहरणे देऊन त्यांनी फुले यांच्या विचार व कार्याची महती सांगितली.
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण गिर्‍हे यांनी केले. अरविंद उलेमाले यांनी प्रा. राणा यांचा परिचय करून दिला तर सदानंद इंगोले यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.