मुंबई
Mission Mumbai मुंबई शहराला हादरवून सोडणाऱ्या भीषण साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर आधारित एक थरारक मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मिशन मुंबई या चित्रपटाचं अधिकृत पोस्टर नुकतंच प्रदर्शित करण्यात आले असून त्याने चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे.
या पोस्टरमध्ये एका कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराचा आक्रमक आणि धडाडीचा अंदाज पाहायला मिळतो. आरडीएक्सचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी केलेल्या जीवघेण्या मोहिमेचा थरार आणि त्यामागील संघर्ष पोस्टरमधून प्रभावीपणे समोर येतो. विशेष म्हणजे, मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांच्या वेळी वापरल्या गेलेल्या सुमारे ३०० किलो आरडीएक्सपैकी १०० किलोचा वापर झाला, तर उर्वरित २०० किलो आरडीएक्स नेमके कुठे गेले , या प्रश्नाभोवती या चित्रपटाची कथा फिरते.
सत्य घटनेवर प्रेरित असलेल्या Mission Mumbai या काल्पनिक कथानकातून प्रेक्षकांना एका गूढ आणि धोकादायक शोध मोहिमेचा अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘रेविकांता फिल्म्स’ निर्मित आणि ‘आकात डिस्ट्रिब्युशन’ प्रस्तुत हा चित्रपट येत्या १५ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.चित्रपटात अभिनेता अजॉय शर्मा प्रमुख भूमिकेत दिसणार असून तो पोलीस इन्स्पेक्टरच्या भूमिकेत झळकणार आहे. त्यांच्या या भूमिकेकडे प्रेक्षकांचे विशेष लक्ष लागले आहे. चित्रपटाची निर्मिती सौ. कांता शर्मा यांनी केली असून दिग्दर्शनाची धुरा चंद्रकांत विसपुते आणि कैलाश पवार यांनी सांभाळली आहे. कथालेखनाची जबाबदारीही चंद्रकांत विसपुते यांनीच पार पाडली आहे.