मुंबईच्या धर्तीवर आंध्रचा विकास!

‘एमएमआरडीए’ मॉडेलला देशभरात मागणी

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
मुंबई,
mmrda-model : मुंबई महानगर प्रदेशाचा विकास घडवून आणणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) च्या कार्यपद्धतीकडे आता इतर राज्यांचे लक्ष वेधले गेले आहे. आंध्र प्रदेश सरकारने आपल्या राज्यातील शहरी विकासाला गती देण्यासाठी ‘मुंबई मॉडेल’ स्वीकारण्याचा निर्णय घेतला असून, त्यासाठी आंध्र प्रदेशातील १८ नागरी विकास प्राधिकरणांचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ मुंबईला भेट देण्यासाठी आले होते.
 
 
 
mmrda
 
 
या दौऱ्याचा उद्देश म्हणजे मुंबईत राबविण्यात येणाऱ्या मोठ्या प्रकल्पांची सखोल माहिती घेणे आणि तेथील नियोजन पद्धती समजून घेणे हा होता. आंध्र प्रदेश सरकारच्या नगरविकास विभागाच्या उपक्रमांतर्गत आयोजित या भेटीत विविध प्राधिकरणांचे वरिष्ठ आयएएस अधिकारी सहभागी झाले होते. त्यांनी शहरी प्रशासन, मोठ्या प्रकल्पांचे आर्थिक नियोजन, जमीन व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधा उभारणी यासंदर्भातील कामकाज जवळून पाहिले.
 
या वेळी एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी शिष्टमंडळाला मार्गदर्शन करताना मुंबईच्या विकासामागील महत्त्वाचे घटक स्पष्ट केले. मजबूत आर्थिक नियोजन, जमीन अभिलेख व्यवस्थापन, मालमत्तेचे अचूक मॅपिंग आणि डेटा-आधारित निर्णयप्रक्रिया यामुळे मोठे प्रकल्प यशस्वी होतात, असे त्यांनी सांगितले. तसेच ‘डिस्काउंटेड कॅश फ्लो’ पद्धती आणि सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) मॉडेल्स कसे वापरले जातात, याचीही माहिती देण्यात आली.
 
मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ६ हजार चौरस किलोमीटर क्षेत्राचे एकत्रित नियोजन, विस्तृत मेट्रो जाळे आणि २०० किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे बोगदा प्रकल्प यामुळे हा प्रदेश जगातील महत्त्वाच्या शहरी विकास प्रकल्पांपैकी एक ठरत आहे. प्रकल्पांसोबत जमीन मूल्यवाढ आणि महसूल व्यवस्थापन कसे संतुलित ठेवायचे, याबाबतही शिष्टमंडळाला मार्गदर्शन करण्यात आले.
 
या यशस्वी मॉडेलमुळे आता देशातील इतर राज्ये आणि काही आंतरराष्ट्रीय संस्थाही एमएमआरडीएकडे आकर्षित होत आहेत. भविष्यातील शहरांसाठी योग्य नियोजन, डिजिटल प्रशासन आणि सर्वसमावेशक गृहनिर्माण यांचा समन्वय अत्यंत महत्त्वाचा असल्याचे या भेटीत अधोरेखित करण्यात आले.