मुंबई
MSRTC राज्यातील लाखो प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) बस तिकीट दरांमध्ये वाढ जाहीर केली आहे. नवीन निर्णयानुसार एसटी बस प्रवासावर १० टक्के हंगामी भाडेवाढ लागू करण्यात आली असून प्रत्येक तिकिटावर अतिरिक्त २ रुपये स्वच्छता अधिभारही आकारला जाणार आहे. या निर्णयामुळे दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर थेट भार पडणार आहे.
उन्हाळी सुट्ट्या आणि वाढत्या प्रवासी मागणीच्या पार्श्वभूमीवर ही भाडेवाढ लागू करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. १४ एप्रिलपासून ही वाढ लागू होणार असून ती काही महिन्यांसाठीच असणार आहे. मात्र २ रुपयांचा स्वच्छता अधिभार कायमस्वरूपी लागू राहणार असल्याची माहितीही समोर आली आहे.या निर्णयामुळे मुंबई, पुणे आणि इतर लांब पल्ल्याच्या मार्गांवरील प्रवास महागला असून साधारण प्रवासाचे भाडे काही प्रमाणात वाढणार आहे. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार बस आणि बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी तसेच सेवा सुधारण्यासाठी हा अधिभार लावण्यात आला आहे.
ई-बस, शिवनेरी, MSRTCशिवशाही आणि काही प्रीमियम सेवांना मात्र या भाडेवाढीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे या सेवांवर प्रवाशांना पूर्वीप्रमाणेच दराने प्रवास करता येणार आहे.या निर्णयामुळे ग्रामीण भागातील तसेच नियमित एसटी प्रवाशांवर आर्थिक भार वाढणार असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान, एसटी महामंडळाने हा निर्णय इंधन दरवाढ, देखभाल खर्च आणि प्रवासी सुविधा सुधारण्याच्या गरजेतून घेतल्याचे स्पष्ट केले आहे.