नवापूर,
leopard-skin-smuggling : नवापूर एमआयडीसी परिसरात बिबट्याच्या कातडीची तस्करी करणाऱ्या एका टोळीचा वनविभागाने पर्दाफाश केला आहे. मुंबई येथील वाइल्ड लाइफ क्राइम कंट्रोल ब्युरो आणि स्थानिक वनविभागाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. या धाडीत पाच संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून बिबट्याची कातडी आणि एक कार तसेच तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार काही लोक बिबट्याच्या कातडीचे तुकडे विक्रीसाठी नवापूर परिसरात येणार होते. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी तात्काळ विशेष पथक तयार केले. या पथकात नंदुरबार, चिंचपाडा आणि नवापूर येथील वनअधिकारी व कर्मचारी सहभागी होते. त्यांनी नवापूर एमआयडीसी परिसरात सापळा रचून संशयितांची वाट पाहिली.
काही वेळातच आरोपी पांढऱ्या रंगाच्या कारमधून आणि दुचाकींवरून त्या ठिकाणी आले. वनविभागाच्या पथकाने त्यांना अडवून तपासणी केली असता त्यांच्या जवळ बिबट्याच्या कातडीचे तुकडे आढळून आले. यानंतर पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांच्याकडील सर्व वाहने जप्त करण्यात आली.
ताब्यात घेतलेल्या आरोपींना आणि जप्त केलेला मुद्देमाल नवापूर येथील मध्यवर्ती रोपवाटिकेत आणण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. ही कातडी कुठून आणली गेली आणि या तस्करीमागे आणखी कोणाचा हात आहे, याचा शोध वनविभाग घेत आहे.