उर्सेच्या लेकीची अंतराळाकडे झेप

लाखोंमधून नेहाची ‘युविका 2026’साठी निवड

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
डहाणू
SRO Yuvika 2026 selection पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील उर्से या आदर्श गावातील विद्यार्थिनी नेहा संदीप पाटील हिने भारतीय अंतराळ संशोधन संस्था आयोजित ‘युविका 2026’ या प्रतिष्ठित कार्यक्रमासाठी निवड मिळवत जिल्ह्याचा मान उंचावला आहे. देशभरातून सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेल्या या अत्यंत स्पर्धात्मक प्रक्रियेतून निवडक विद्यार्थ्यांमध्ये स्थान मिळवणे ही मोठी कामगिरी मानली जात आहे.
 

Neha Sandeep Patil ISRO Yuvika 2026 selection 
उर्से गावातील रहिवासी आणि बोर्डी येथील एस.पी.एच. हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिक्षण घेणाऱ्या नेहाने पालघर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे. यासोबतच तिने महाराष्ट्र राज्यातही अव्वल स्थान पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. राज्यातून निवड झालेल्या केवळ १४ विद्यार्थ्यांमध्ये तिचा समावेश असून, पालघर जिल्ह्यातील ती एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.
या निवडीनंतर नेहाला येत्या २० मेपासून तामिळनाडूमधील श्रीहरिकोटा इस्रो केंद्र येथे दोन आठवड्यांच्या विशेष प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी मिळणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान तिला अंतराळ विज्ञान, उपग्रह तंत्रज्ञान आणि विविध प्रात्यक्षिक प्रयोगांचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार आहे. त्यामुळे तिच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक प्रवासाला नवे वळण मिळणार आहे.
नेहाच्या या यशामुळे तिच्या कुटुंबासह शाळा आणि संपूर्ण उर्से गावात आनंदाचे वातावरण आहे. तिचे वडील संदीप पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “नेहाच्या सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीमुळेच हे यश शक्य झाले आहे.”उर्से गाव हे पालघर जिल्ह्यात आदर्श गाव म्हणून ओळखले जाते. गावावर स्वाध्याय परिवार यांसारख्या अध्यात्मिक चळवळींचा प्रभाव असून, त्यामुळे येथील विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, संस्कार आणि शिक्षणाबद्दलची ओढ निर्माण झाली आहे. याच वातावरणाचा परिणाम म्हणून नेहासारखी विद्यार्थिनी आज अंतराळ क्षेत्रात झेप घेण्यासाठी सज्ज झाली आहे.दरम्यान, नेहाच्या या यशाबद्दल गावकऱ्यांकडून तिचा सत्कार करण्यात येत असून, भविष्यात ती आणखी प्रगती करून शाळा, गाव, जिल्हा आणि देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.