लखनौ,
no-hsrp-no-puc : उत्तर प्रदेशमध्ये वाहनधारकांसाठी नवीन नियम लागू करण्यात आला असून आता वाहनांना प्रदूषण नियंत्रण (PUC) प्रमाणपत्र मिळवण्यासाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट (HSRP) असणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास थेट १०,००० रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार आहे.
परिवहन विभागाने PUC प्रणालीला HSRP डेटाशी जोडल्यामुळे ज्या वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नाही, त्यांना आता प्रदूषण प्रमाणपत्र मिळणार नाही. परिणामी असे वाहन रस्त्यावर चालवणे नियमबाह्य ठरणार आहे. या नव्या नियमाचा उद्देश फसवे नंबर प्लेट्स आणि नियमभंग रोखणे हा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हा नियम १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांवर अधिक प्रभावीपणे लागू होणार आहे, कारण या वाहनांमध्ये HSRP नसण्याचे प्रमाण मोठे आहे. जर वाहनचालकाकडे वैध PUC नसेल तर त्याला १०,००० रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, तसेच HSRP नसल्यास वेगळा दंडही लागू होणार आहे.
दरम्यान, सरकारने नागरिकांना लवकरात लवकर HSRP बसवून घेण्याचे आवाहन केले असून नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.