कांदा काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांवर पुन्हा संकट

मजुरांचा मोठा तुटवडा

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
आंबेगाव
onion आंबेगाव तालुक्यात सध्या कांदा काढणीचा हंगाम जोरात सुरू असला तरी शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाढते तापमान, मजुरांची तीव्र टंचाई, वाढलेले मजुरी दर आणि बाजारपेठेत मिळणारा अत्यल्प भाव यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक तसेच मानसिक तणावाखाली सापडले आहेत. त्यातच अवकाळी पावसाची भीती कायम असल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे.
 

onion 
तालुक्यात सर्वत्र कांदा काढणीची लगबग सुरू असली तरी स्थानिक मजूर उपलब्ध होत नसल्याने कामे खोळंबली आहेत. उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे स्थानिक मजूर शेतात काम करण्यास टाळाटाळ करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यांतून मजूर आणण्याची वेळ येत असून, त्यासाठी मोठा खर्च आणि धावपळ करावी लागत आहे. परिणामी उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली आहे.
मजुरांची कमतरता आणि वाढते दर यामुळे कांदा काढणीचा खर्च परवडेनासा झाला आहे. वेळेत कांदा काढणी झाली नाही तर पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असल्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. या परिस्थितीबाबत स्थानिक शेतकरी नेते तथा माजी सरपंच राजूशेठ ढोबळे आणि शेतकरी अनिल शेवाळे यांनी चिंता व्यक्त केली असून, मजूर उपलब्धतेअभावी शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असल्याचे त्यांनी सांगितले.दरम्यान, अवकाळी पावसाची शक्यता कायम असल्याने शेतकऱ्यांनी कांदा काढणीला वेग दिला आहे. यापूर्वी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा अनुभव लक्षात घेता शेतकरी अधिकच धास्तावले आहेत. त्यामुळे पिक वाचवण्यासाठी मिळेल त्या परिस्थितीत काढणी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.
बाजारपेठेत कांद्याला आंबेगाव तालुक्यात सध्या कांदा काढणीचा हंगाम जोरात सुरू असला तरी शेतकऱ्यांना विविध अडचणींचा सामना करावा  समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिकच गंभीर झाली आहे. मजुरीचा खर्च कसा भागवायचा आणि उत्पादन कसे सावरणार, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. मागील हंगामातही अपेक्षित दर न मिळाल्याने अनेक शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले होते. काही ठिकाणी कांदा फेकून देण्याची वेळ आल्याचेही शेतकरी सांगतात.सध्या शेतकरी भविष्यात बाजारभाव सुधारतील या आशेवर कांदा काढणी करून साठवणुकीची तयारी करत आहेत. मात्र मजूर टंचाई, वाढता उत्पादन खर्च आणि अस्थिर बाजारभाव यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे संकट दिवसेंदिवस अधिकच गडद होत असल्याचे चित्र आंबेगाव तालुक्यात दिसून येत आहे.