गडचिरोली,
railway trial जिल्ह्यातील रेल्वे संपर्काच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून देसाईगंज ते आरमोरी या नव्या रेल्वेमार्गावर नुकतीच ट्रायल रन यशस्वीरीत्या पार पडली आहे. मालवाहू डब्यांसह एक इंजिन देसाईगंजहून आरमोरीपर्यंत धावल्याने स्थानिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आजवर केवळ देसाईगंज तालुक्यातूनच रेल्वे सेवा उपलब्ध होती. त्यामुळे जिल्ह्याच्या इतर भागांतील नागरिकांना रेल्वे सुविधेसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर देसाईगंज ते गडचिरोली असा रेल्वेमार्ग साकारला जात असून गेल्या तीन वर्षांपासून या कामाला वेग आला आहे. या प्रकल्पाअंतर्गत देसाईगंज ते आरमोरीपर्यंतचा रेल्वेमार्ग आता वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ट्रायल बेसिसवर मालवाहू डब्यांसह इंजिन धावविण्यात आले. ही चाचणी यशस्वी झाल्याने लवकरच या मार्गावर नियमित रेल्वे सेवा सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या महत्त्वपूर्ण टप्प्यामुळे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार असून प्रवासी व मालवाहतूक दोन्हींसाठी हा मार्ग उपयुक्त ठरणार आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेचे स्वागत करत आनंद व्यक्त केला आहे. आरमोरी येथील नागरिकांसाठी गुरुवारचा दिवस आनंददायी ठरला.railway trial वडसा-गडचिरोली या नव्याने उभारण्यात येत असलेल्या रेल्वे मार्गावरून आरमोरी येथे प्रथमच मालवाहू ट्रेनचे आगमन झाले. ही मालगाडी रेल्वे मार्गाच्या कामाचे साहित्य घेऊन छत्तीसगडच्या भिलाई येथून आली होती.
गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच रेल्वे धावली असून, जिल्ह्यातील एकमेव वडसा रेल्वेस्टेशनमधून आरमोरीपर्यंत मालगाडीने प्रवास केला आहे. ही मालगाडी पाहून आरमोरीकर अचंबित झाले व त्यांना कुतूहल वाटू लागले. अनेकांनी या मालगाडीचा फोटो काढून सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे.
16 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास वडसा येथून लोखंडी रुळ घेऊन निघालेली मालवाहू ट्रेन आरमोरी रेल्वे स्थानकावर पोहोचली. नवीन मार्गावरून चाचणीसाठी ट्रेन धावणार असल्याची माहिती वार्यासारखी पसरताच अबालवृद्धांनी रेल्वे स्थानकाकडे धाव घेतली. ट्रेन येताच नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात तिचे स्वागत केले. विशेषतः लहान मुलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. अनेकांनी हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये कैद केला.
वडसा-गडचिरोली हा रेल्वेमार्ग पूर्ण झाल्यानंतर गडचिरोली जिल्हा थेट रेल्वे नकाशावर येणार असून व्यापार, उद्योग व रोजगाराच्या संधींनाही मोठी चालना मिळणार आहे.