चंद्रपूर,
rare animal fossils महाराष्ट्रात पहिल्यांदाच वर्धा नदीच्या किनारी धानोरा, भोयेगाव पुलाजवळ बायसन, हरिण, डुक्कर व मानवी अल्प जीवाश्मे तसेच पाषाणयुगीन अवजारे सापडली असून, ही शेवटच्या हिमयुगीन, प्लेइस्टेसीन काळातील 20 हजार वर्षांदरम्यान अतिशय नवीन प्राण्यांची जीवाश्मे असल्याची माहिती चंद्रपूरचे भूशास्त्र आणि पुरातत्व अभ्यासक सुरेश चोपणे यांनी दिली आहे. आजपर्यंत अशी जीवाश्म महाराष्ट्रात आढळली नसल्याचा दावाही चोपणे यांनी केला आहे. नदीजवळ आढळलेल्या प्राण्यात जास्त प्रमाणात बायसन जीवाश्म आढळले. कमी प्रमाणात बायसन व हरिणाचे हाड, मानवाच्या पाषाण युगीन अवजारांसोबत काही मानवाची आणि प्राण्यांची हाडेही आढळली आहे.

पाषाणयुगीन मानवांची अवजारेसुद्धा या अलीकडील प्राण्यांच्या जवळच आढळली असून, मानव त्यांची शिकार करीत होते हे सिद्ध होते. 20 हजार वर्षादरम्यान जगात हिमयुग होते. त्यानंतर ते तापमानामुळे वितळले आणि प्रचंड महापूर आला. याच महापुरात विदर्भ आणि चंद्रपूरमधील सर्व प्राणी नदीत वाहून गेले आणि गाळात गाडले गेले.rare animal fossils काही हजार वर्षानंतर त्यांचे जीवाश्मात रूपांतर झाले. वर्धा नदीच्या वरोडा आणि चंद्रपूर तालुक्यातच काही ठिकाणी नदीत वाहून आलेला गाळ, रेती आणि दगड आढळतात, अशी माहिती चोपणे यांनी दिली.
200 कोटी ते 20 हजार वर्षांपर्यंतचे जीवाश्म
चंद्रपूर जिल्हा हा भूशास्त्राच्या आणि जीवाश्माच्या बाबतीत देशात सर्वाधिक महत्वाचा जिल्हा आणि भूशास्त्रीय संग्रहालय मानल्या जातो. 200 कोटी ते 20 हजार वर्षांपर्यंतचे जीवाश्म आढळते. त्यातील 150 कोट्यावधी वर्षाचे स्ट्रोमॅटोलाईट, 20 कोटी वर्षाचे वृक्ष आणि पानांचे जीवाश्म, 6 कोटी वर्षाची डायनासोर, वृक्ष, शंख-शिंपले आणि अगदी अलीकडील 20 हजार वर्षाच्या हत्तीचे जीवाश्म आहेत. अलीकडील प्राण्यांचे जीवाश्म भारतात क्वचितच आढळली आहेत. देशात प्रथमच अशी जीवाश्म चंद्रपूर शहराजवळ सापडल्याचा दावा चोपणे यांनी केला आहे.