रोहित शेट्टींवर हल्ल्यासाठी दिली होती मोठी रक्कम

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
मुंबई
Rohit Shetty दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला महत्त्वाचे यश मिळाले असून आणखी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश टास्कफोर्सच्या मदतीने आग्रा येथून प्रदीपकुमार रामसिंग उर्फ छोटू याला अटक करण्यात आली आहे. या अटकेमुळे प्रकरणातील आरोपींची संख्या आता नऊवर पोहोचली आहे.
 

Rohit Shetty 
गुन्हे शाखेच्या तपासात या हल्ल्यासाठी आरोपींना मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये प्रदीपकुमारचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र, प्रदीपकुमार गेल्या चार महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत फरार होता.दरम्यान, तो घरी परतण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार सापळा रचत उत्तर प्रदेशातील आग्रा शहरातील अशोकनगर, न्यू बस्ती पक्की तलैया परिसरातून त्याला अटक करण्यात आली. चौकशीत प्रदीपकुमारने गुन्ह्यातील सहभाग कबूल केला असून तो सोशल मीडियावरून शुभम लोणकर याच्या पोस्ट आणि बातम्यांमुळे प्रभावित झाल्याचे सांगितले आहे. अंडरवर्ल्डमध्ये वर्चस्व निर्माण करण्याच्या उद्देशाने सनी, दीपू आणि सोनू या साथीदारांसह तो या कटात सहभागी झाल्याचेही त्याने मान्य केले.
या प्रकरणात यापूर्वी आठ Rohit Shetty आरोपींना अटक करण्यात आली होती. प्रदीपकुमारच्या अटकेनंतर तपासाला अधिक गती मिळाली असून पोलीस त्याच्या माध्यमातून मुख्य आरोपी शुभम लोणकरपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या संपूर्ण प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जानेवारी रोजी सिद्धार्थ येनपुरे आणि समर्थ या आरोपींनी पुण्याहून मुंबईत दुचाकी आणून ती विलेपार्ले रेल्वे स्थानकाबाहेर उभी केली होती. गोळीबारासाठी याच दुचाकीचा वापर करण्यात आल्याचा संशय आहे. गोळीबार करणारा मुख्य शूटर हा मूळचा बिहारचा रहिवासी असून त्याने चार ते पाच साथीदारांसह मुंबईत वास्तव्यास राहून घटनेपूर्वी रोहित शेट्टी यांच्या घराची अनेक वेळा रेकी केल्याचे तपासात समोर आले आहे.१ फेब्रुवारीच्या मध्यरात्री जुहू येथील रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर गोळीबार करण्यात आला होता. चित्रपटसृष्टीत दहशत निर्माण करणे आणि खंडणी उकळणे हा या हल्ल्यामागील उद्देश असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कुख्यात गुंड शुभम लोणकरच्या टोळीच्या सूचनेनुसार हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप असून पोलीस मुख्य सूत्रधाराचा शोध घेत आहेत.