नागपूर,
Nandanvan School नंदनवन दुबळ मनस्क मुलांची शाळा, सीताबर्डी येथे विज्ञान प्रात्यक्षिक आणि विज्ञान कार्यशाळा मोठ्या उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्या जिज्ञासेला चालना मिळावी या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना विविध गंमतीदार आणि आकर्षक विज्ञान प्रयोगांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. प्रयोगांमधून घडणाऱ्या प्रक्रियांचे निरीक्षण करताना विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. प्रत्येक प्रयोगामागील वैज्ञानिक तत्त्वे सोप्या आणि समजण्यास सुलभ अशा भाषेत स्पष्ट करण्यात आली, त्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानातील संकल्पना अधिक प्रभावीपणे समजल्या.

कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांना विज्ञानावर आधारित विविध उपक्रमांमध्ये प्रत्यक्ष सहभागी होण्याची संधी देण्यात आली. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती, निरीक्षण क्षमता आणि सर्जनशीलता विकसित होण्यास मदत झाली. विशेषतः, विद्यार्थ्यांनी प्रयोग करताना दाखविलेला उत्साह आणि कुतूहल हे लक्षवेधी ठरले. यावेळी सोशीओ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ट्रस्ट च्या यंग कलाम डिस्कव्हरी सायन्स सेंटरचे कालिदास नाकाडे आणि निखिल लक्षणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी प्रयोगांचे सादरीकरण करताना विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंका निरसन केले आणि विज्ञान शिकणे कसे सोपे व आनंददायी होऊ शकते हे दाखवून दिले. Nandanvan School यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात आले.
सौजन्य: माधुरी पाडळकर, संपर्क मित्र