सिरोंचा तालुक्यात वीजपुरवठ्याचा बोजवारा

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
सिरोंचा, 
sironcha : Power supply  सिरोंचा तालुक्यातील वीजपुरवठ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली असून, तिचे तीव्र वास्तव नागरिकांना थेट अनुभवायला मिळत आहे. विशेष म्हणजे, या समस्येविरोधात महावितरण कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळाला देखील याच समस्येचा फटका बसला. निवेदन सादर करत असतानाच अचानक वीजपुरवठा खंडित झाला आणि संपूर्ण कार्यालय अंधारात बुडाले. त्यामुळे निवेदन देण्यासाठी आलेल्या नागरिकांना अक्षरशः बाहेर येऊन आपली मागणी मांडावी लागली. या प्रकारामुळे उपस्थितांमध्ये संतापाची लाट उसळली.
 
 
sironcha
 
हा प्रकार केवळ योगायोग नसून, सिरोंचा तालुक्यातील वीज व्यवस्थेची बिकट अवस्था अधोरेखित करणारा आहे, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. ज्या विभागाकडे तक्रार मांडण्यासाठी नागरिक येतात, त्याच ठिकाणी वीज नसणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगत सामान्य नागरिकांची अवस्था मग काय असेल? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला. सध्या तालुक्यात दिवसातून अनेकवेळा वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यातच कमी दाबाने वीज येत असल्याने घरगुती तसेच व्यावसायिक उपकरणे बंद पडत आहेत. फ्रिज, टीव्ही, कुलर, पंखे यांसारखी साधी उपकरणेसुद्धा व्यवस्थित चालत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शेतकर्‍यांच्या मोटारी आणि लघुउद्योजकांची यंत्रसामग्री जळून नुकसान होत असल्याच्या घटनाही वाढल्या आहेत. उन्हाळ्याच्या कडाक्यात ही परिस्थिती अधिकच असह्य बनली असून लहान मुले, वृद्ध आणि रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.
 
 
sironcha : Power supply  तेलंगणा राज्यातील किष्टमपेट येथून प्रस्तावित 132 केव्ही विद्युत वाहिनीचे काम मागील एक वर्षापासून बंद असल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. या संदर्भात उपविभागीय कार्यकारी अभियंता बालपांडे यांच्याशी चर्चा केली असता, सिरोंचा येथील वीजपुरवठ्याची समस्या ही स्थानिक पातळीवरील नसून वरच्या स्तरावरून येणार्‍या व्होल्टेजवर अवलंबून असल्याचे सांगितले. 132 केव्ही लाईनबाबत माहिती असूनही तेलंगणा राज्यातील काही अधिकार्‍यांकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. तरीही हे काम लवकर पूर्ण व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 
 
 
पुढील आठ दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल. तसेच परिस्थिती सुधारली नाही, तर वीज बिल न भरण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदन देताना शिष्टमंडळात प्रशांत राचर्लावार, सतीश राचर्लावार, समीर आरगेलवार, शारीक शेख, संदीप राचर्लावार, मनीष गुज्जावार, रवीतेजा माणिख्यमवार, मनीष राचर्लावार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.