शनिवारी साजरा होणार राज्यफूल ‘ताम्हण’चा उत्सव

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
नागपूर
Tamhani flower festival Nagpur उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. सर्वत्र रुक्ष वातावरण असताना महाराष्ट्राचे राज्यफूल अससेले ‘ताम्हण’ हे फूल कडक उन्हातही जांभळ्या रंगांची उधळण करीत आहे. नागपुरातील काही रस्ते या फुलांनी बहरले आहे. दै. तरुण भारत संगे आपण सारे येत्या शनिवारी(१८ एप्रिल) ‘पावले ही फुलांची’ या उपक्रमात ‘ताम्हण’ या राज्यफुलाचा उत्सव साजरा करणार आहोत.
 

Tamhani flower festival Nagpur 
विविध प्रकारच्या फुलांनी बहरलेले शहर, अशी नागपूरची नवी ओळख गेल्या दोन दशकांत तयार झाली आहे. विविध फुलांनी बहरलेले रस्ते नागपूरकरांना नैसर्गिक सोंदर्याची अनुभूती देत आहेत. दै. तरुण भारतने शताब्दी वर्षाचे निमित्त साधून नागपूरकरांना या वैभवाची प्रत्यक्षानुभूती देण्यासाठी ‘पावले ही फुलांची’ या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. यापूर्वी ‘सप्तपर्णी’ आणि ‘बुच’ उत्सवाला मिळालेल्या रसिकांच्या प्रेमानंतर आता ‘ताम्हण’ या राज्यफुलाचा उत्सव येत्या शनिवारी १८ एप्रिल रोजी आयोजित केला आहे.
या कार्यक्रमात Tamhani flower festival Nagpur राज्यफूल असलेल्या व ताम्हण, जारूळ, बोंडारा, बोंद्रा आदी नावांनी ओळखल्या जाणाऱ्या या झाडाची व फुलाची शास्त्रीय माहिती आणि पर्यावरणीयदृष्ट्या असलेले महत्त्व ऑरा कन्झर्वेशन पार्कचे संस्थापक अंबरीश घटाटे, निसर्गप्रेमी डॉ. वृंदा जोगळेकर उपस्थितांना सांगणार आहेत. कार्यक्रमाला धनवटे नॅशनल कॉलेजचे रासेयो समन्वयक डॉ. राजकुमारगिरी गोसावी आणि जनसंवाद विभाग प्रमुख नितीन कराळे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.
उपस्थितांच्या मनातील प्रश्न आणि शंकांचे समाधानही मान्यवर तज्ज्ञ मंडळी करतील.
 

कार्यक्रम कुठे आणि कधी?
गोरक्षण चौकाकडून काँग्रेसनगरकडे जाणाऱ्या मार्गावर होमगार्ड प्रशिक्षण केंद्रासमोरील पदपथावर शनिवार १८ एप्रिल रोजी सकाळी ८ ते ८.४५ या वेळेत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ताम्हण फुलांच्या या उत्सवात नागरिकांनी अधिकाधिक संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.