सावली,
turtle smuggling अघोरी पुजेसाठी कासव तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील आरोपींच्या भ्रमणध्वनीत अघोरी पुजेच्या चित्रफीती, स्मशानभूमीत मध्यरात्री केलेल्या अशुभ विधींचे चित्रीकरण तसेच घुबड व कासवांचे फोटो आढळले. याशिवाय अनेक तरुण मुली आणि विधवा महिलांच्या छायाचित्रांसह त्यांच्या जन्मकुंडल्या व अत्यंत खाजगी स्वरूपाची माहितीही सापडली. काही महिलांच्या मासिक पाळीच्या तारखांची नोंद ठेवण्यात आल्याचेही उघड झाले आहे. या सर्व प्रकारामुळे महिलांचे मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण झाल्याची शक्यताही आता व्यक्त होत आहे.
दरम्यान, सावली तालुक्यात कासवांची तस्करी करणार्या आंतरतालुका टोळीचा वनविभागाने पर्दाफाश केला आहे. व्याहाड खुर्द उपक्षेत्रातील चिचडोह बॅरेज परिसरात ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या 6 आरोपींना गुरुवारी सावली न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन आरोपींना वनकोठडी, तर तिघांची रवानगी कारागृहात केली.
लवकर श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी अघोरी पूजा करून महिलांना फसवण्याचे रॅकेट चालवण्याचा हा प्रकार आहे. त्यासाठी मूल आणि पोंभुर्णा तालुक्यातील आरोपींनी वन्यजीव कायद्याचे उल्लंघन करून कासवांची तस्करी सुरू केली होती. 12 एप्रिल रोजी सायंकाळी वनविभागाला माहिती मिळाली. त्या आधारे चिचडोह बॅरेज ते हरंबा या कच्च्या रस्त्यावर सापळा रचण्यात आला. संशयास्पदरित्या वावरणार्या टोळीला घेरले असता, त्यांच्याकडे दोन मोठे कासव, दुचाकी आणि भ्रमणध्वनी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात आरोपी गंगाधर पांडू बुरांडे (49), मोरेश्वर देविदास देवतळे (38, दोघेही रा. जाम खुर्द), ओमदेव शिंदे (25), हेमचंद उमाजी शेंडे (28), धवल उष्टू वेलादी (30, तिघेही रा. गणपूर) आणि राजेंद्र शाम दिवसे ( 52, रा. चकनवेगाव) यांना अटक करण्यात आली. आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 चे कलम 9,39,49, 50 व 51 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.
या टोळीचे जाळे चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील चिमूर, पोंभुर्णा आणि चामोर्शी या ग्रामीण भागांपर्यंत पसरलेले आहे. सुमारे 50 मध्यस्थ या रॅकेटमध्ये कार्यरत होते. गुप्तधन मिळवून देणे, पैशाचा पाऊस पाडणे अशा आमिषांद्वारे गरीब व श्रीमंत अशा दोन्ही स्तरांतील लोकांना फसवले जात होते. आरोपींनी अघोरी पुजेतून सोन्याची बिस्किटे मिळाल्याचा बनाव रचला होता. मात्र, वनविभागाच्या कारवाईदरम्यान ही बिस्किटे बनावट असल्याचे स्पष्ट झाले.turtle smuggling चौकशीदरम्यान पुढे आलेल्या 16 आरोपींनासुद्धा चौकशीकरिता नोटीस बजावली असून, यात अनेक मोठे मासेदेखील गळाला लागण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणातील ‘मास्टरमाइंड’चा शोध सुरू आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास मुख्य वनसंरक्षक रामानुजम यांच्या मार्गदर्शनाखाली राजन तलमले यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूरचे सहायक वनसंरक्षक विकास तरसे व सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांच्यासह वनकर्मचारी करीत आहे.
===
(बॉक्समधील मजकूर...)
===
कासव तस्करी, मात्र अघोरी पुजेचा दावा नाहीः धुर्वे
आरोपींकडचे दोन कासव ताब्यात घेतले असून, त्यांची तपासणी करून ते न्यायालयाच्या आदेशानुसार निसर्गमुक्तही केले आहे. कासव तस्करी नक्की होत आहे आणि त्याद्दष्टीने आमचा तपास जोरात सुरू आहे. आणखी दोन कासव संशियताकडे आहे. ते मिळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. नव्याने 16 ते 17 संशयितांना ताब्यात घेतले आहे. अघोरी पुजेच्या चित्रफिती मिळाल्या आहेत. मात्र, त्या बनावट असू शकतात. त्यामुळे आताच आम्ही तसा कुठलाही दावा करू शकत नाही, असे मत सावलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांनी तभाकडे व्यक्त केले.