काँक्रीटखाली हिरवाईचा श्वास

उड्डाणपुलाखाली ‘शहरी शेती’चा अनोखा प्रयोग

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
मुंबई
urban farming शहरातील मोकळ्या व दुर्लक्षित जागांचा पर्यावरणपूरक वापर करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत विलेपार्ले येथील पश्चिम द्रुतगती मार्गावरील उड्डाणपुलाखाली मुंबईतील पहिल्या मोठ्या ‘शहरी शेती’ प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले आहे. या अभिनव उपक्रमामुळे शहरातील काँक्रीटच्या जंगलात हिरवाईचा नवा श्वास निर्माण होणार आहे.
 

urban farming  
भाजप आमदार पराग अळवणी यांच्या संकल्पनेतून आणि विलेपार्ले कल्चरल सेंटर तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सहकार्याने हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. उड्डाणपुलाखालील अन्यथा निष्क्रिय आणि अनेकदा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडणारी जागा आता प्रत्यक्ष शेतीसाठी वापरली जाणार आहे.
या प्रकल्पात शास्त्रोक्त urban farming पद्धतीने तयार करण्यात आलेल्या वाफ्यांमध्ये भाजीपाला आणि विविध वनस्पतींची लागवड सुरू झाली आहे. काही वाफ्यांमध्ये रोपे अंकुरताना दिसत असून परिसर हळूहळू हिरवाईने फुलत असल्याचे चित्र आहे. शहरातील नागरिकांना शेतीची प्रत्यक्ष माहिती मिळावी यासाठी येथे प्रशिक्षण वर्ग, वनस्पती वैविध्य दालन आणि वनस्पती देखभाल केंद्रही उभारण्यात येणार आहे.या उपक्रमामागील उद्देश केवळ शेतीपुरता मर्यादित नसून उड्डाणपुलाखालील जागेचा योग्य वापर, अतिक्रमणावर नियंत्रण आणि पर्यावरणपूरक नागरी विकासाला चालना देणे हा आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना शहरी शेतीची ओळख करून देण्याबरोबरच बाल्कनी व गच्चीवरील बागायतीसाठीही मार्गदर्शन केले जाणार आहे.विलेपार्ले परिसरातील या उपक्रमाला स्थानिक पातळीवर सकारात्मक प्रतिसाद मिळत असून मुंबईसारख्या महानगरात अशा प्रकल्पांचा विस्तार झाल्यास शहराच्या पर्यावरणीय समतोलाला मोठा हातभार लागेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.