रायपूर,
Vedanta power plant explosion case छत्तीसगडमधील शक्ती जिल्ह्यात घडलेल्या वेदांता वीज प्रकल्पातील भीषण स्फोटप्रकरणी पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे. कंपनीचे प्रमुख अनिल अग्रवाल यांच्यासह एकूण आठ जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दाभरा पोलीस ठाण्यात ही नोंद करण्यात आली असून, प्रकल्प प्रमुख देवेंद्र पटेल यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत २० कामगारांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. शक्तीचे पोलीस अधीक्षक प्रफुल्ल ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, निष्काळजीपणामुळे मृत्यू होणे तसेच यंत्रसामग्री हाताळण्यात झालेल्या हलगर्जीपणाशी संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात आठ ते दहा अधिकाऱ्यांची नावे समाविष्ट असून, तपासादरम्यान आणखी कोणी जबाबदार आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेचा सखोल तपास सुरू असून विविध अहवालांची प्रतीक्षा केली जात आहे. मृतांचे शवविच्छेदन अहवाल, न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे निष्कर्ष तसेच औद्योगिक आरोग्य आणि सुरक्षा विभागाचा अहवाल मिळाल्यानंतर पुढील कारवाई निश्चित केली जाईल. स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा उलगडा करण्यासाठी तांत्रिक तज्ज्ञांचे पथकही नेमण्यात आले आहे.
१४ एप्रिल रोजी या वीज प्रकल्पात झालेल्या स्फोटामागे उच्च दाबाची वाफ वाहून नेणाऱ्या लोखंडी नळीत बिघाड झाल्याचे प्राथमिक कारण समोर आले आहे. या घटनेत अनेक कामगार गंभीररीत्या भाजले गेले होते. आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला असून १६ जणांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज पटेल यांच्या नेतृत्वाखाली हे पथक कार्यरत असून त्यात उपविभागीय पोलीस अधिकारी सुमित गुप्ता, न्यायवैद्यक तज्ज्ञ सृष्टी सिंग आणि ठाणेदार राजेश पटेल यांचा समावेश आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल आणि पीडित कुटुंबांना आवश्यक ती मदत दिली जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिले आहे.