पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
पाणीटंचाई उपाययोजनांचा पालकमंत्र्यांकडून आढावा
नागरिकांच्या तक्रारी येता कामा नये

यवतमाळ, 
जिल्ह्यातील Water shortage पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड आणि आदिवासी विकासमंत्री डॉ. उईके यांनी गुरुवारी आढावा घेतला. जिल्ह्यातील कोणत्याही भागात पाण्यासाठी नागरिकांच्या तक्रारी येता कामा नये. त्यासाठी प्रशासनाने सज्ज राहून टिमवर्क करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी अधिकार्‍यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात झालेल्या या प्रशासकीय विभागांच्या आढावा बैठकीला आमदार किसन वानखेडे, जिल्हाधिकारी विकास मीना, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्यासह उपविभागीय अधिकारी, विभागांचे कार्यकारी अभियंता उपस्थित होते.
 
 
pani
 
पालकमंत्री संजय राठोड यांनी या बैठकीत जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान, धरण व बंधार्‍यातील पाणीसाठा, पाणी टंचाई निवारणार्थ कृती आराखडा, जनावरांसाठी चारापाणी, विहीर अधिग्रहण, जलसंधारणाचे काम, भूजल पाणी पातळी, राष्ट्रीय पेयजल योजना, टँकरने पाणी पुरवठा, ग्रामीण पाणी पुरवठा योजना, नळ पाणी पुरवठा योजना, जलजीवन मिशन, नगर पाणीपुरवठा यासह विविध विषयांचा तालुकानिहाय व नगर परिषद निहाय आढावा घेतला. पाणी टंचाई निवारणासाठी ग्रामीण पाणी पुरवठा योजना, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणी पुरवठा योजना, नळपाणी पुरवठा योजनांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. तसेच वर्षानुवर्ष पाणीटंचाई व टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो अशा गावांमध्ये कायमस्वरूपी उपाययोजनांची कामे प्राधान्याने करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
 
 
Water shortage  पाणी टंचाईबाबत शासन गंभीर असून शहरी व ग्रामीण भागातील नळ पाणीपुरवठा योजना पूर्ण होऊन पाणी पुरवठा सुरू झाला पाहिजे. जिल्ह्यातील कोणत्याही भागात पाण्यासाठी नागरिकांच्या तक्रारी येता कामा नये. त्यासाठी लक्ष देऊन काम करावे. यात हयगय, कामचुकारपणा केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश पालकमंत्र्यांनी अधिकार्‍यांना दिले. मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्पांमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त पाणीसाठा उपलब्ध असून सद्यस्थितीत ४९.९९ टक्के पाणीसाठा आहे. तसेच सद्यस्थितीत चार गावांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. त्यामध्ये पुसद तालुक्यातील येलदरी, बुटी ई, कारला आणि आर्णी तालुक्यातील कारेगाव या गावांचा समावेश असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.