सिंदीत वीस वर्षांनंतर पहिल्यांदाच दिवसाआड पाणी!

    दिनांक :17-Apr-2026
Total Views |
नगराध्यक्ष राणी यांनी पळविले अनेकांच्या तोंडचे पाणी!
 
सिंदीरेल्वे, 
Water supply मागील दोन दशकापासून उग्ररुप धारण केलेली येथील पाण्याची समस्या यंदा नगराध्यक्ष राणी कलोडे यांनी संपुष्टात आणून अनेक माजी पदाधिकार्‍यांच्या तोंडचे पाणीच पळविले! शहरात दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणी टंचाई जाणवत असते. प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे ही समस्या जाणवत असल्याची ओरड होती. वीस वर्षांत जवळपास अर्धा डझन नगराध्यक्ष झालेत. परंतु, मजीप्राच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून हा तिढा सोडवण्याचा कोणी प्रामाणिक प्रयत्न केला नाही. उलट कमी अश्वशतीच्या मोटारी वाकसूरच्या पंपसेटवर स्थापित करुन समस्या तीव्र करण्यात काहींनी भर घातली होती. दै. तरुण भारतने त्या संदर्भात वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले आहे.
 
 
water
 
यंदा नगराध्यक्ष राणी स्नेहल कलोडे यांनी या समस्येच्या मुळाशी जाण्यासाठी उपाध्यक्ष शेख अकील व सभापतींना पुर्ण अधिकार दिले. अकील यांनी रात्री बेरात्री वाकसूरचे दौरे केले. Water supply पाणीपुरवठा समितीच्या सदस्यांनी दिलेल्या अहवालानुसार नगराध्यक्ष कलोडेे यांनी ठेकेदारीवर नवीन यंत्रणा तयार केली. जादा अश्वशतीचे पंपसेट बसविले आणि अनेक जागांवरील पाण्याची गळती थांबवली. परिणामी, १० तासांत भरणारा जलकुंभ आता साडे सहा तासात भरतो आहे. चार दिवसांनंतर जनतेला मिळणारे पाणी आता एक दिवसाआड भक्कम प्रमाणात मिळत आहे.
 
 
Water supply  नगराध्यक्ष राणी कलोडे यांनी आ. समीर कुणावार यांच्या माध्यमातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता धोटे यांचे सहकार्य घेतले. त्यांनी सुचविलेली खबरदारी घेतली आणि शहरात तीन झोनमध्ये पाणी पुरवठा करण्याचे वेळापत्रक तयार केले. एवढेच नाही तर ते सार्वजनिक देखील केले. सध्या, शहरातील गृहिणींना भरपूर व नियोजित वेळेत पाणी मिळत असल्याने महिला राणी कलोडे यांना धन्यवाद देत आहेत. या प्रकारामुळे अनेक माजी नगरसेवकांच्या तोंडचे पाणी पळाल्याची चर्चा रंगतांना दिसत आहे, एवढे नक्की!