नवी दिल्ली,
womens-reservation-bill : लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्यानंतर सत्ताधारी एनडीएच्या महिला खासदारांनी संसद परिसरात जोरदार आंदोलन केले. या विधेयकाला अपेक्षित दोन-तृतीयांश बहुमत न मिळाल्याने ते फेटाळले गेले आणि त्यानंतर राजकीय वातावरण तापले.
महिला आरक्षण विधेयक हे महिलांना लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी आणण्यात आले होते. मात्र मतदानात आवश्यक पाठिंबा न मिळाल्यामुळे हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. यानंतर सत्ताधारी पक्षातील महिला खासदारांनी विरोधकांवर आरोप करत संसद भवनाबाहेर निषेध नोंदवला.
महिला खासदारांनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत विरोधकांनी महिलांच्या सक्षमीकरणाच्या प्रक्रियेत अडथळा आणल्याचा आरोप केला. या घटनेमुळे संसद परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
दरम्यान, विरोधकांनी मात्र या विधेयकाला दिलेल्या विरोधाचे समर्थन करत, हे विधेयक डिलिमिटेशनशी जोडल्यामुळे ते मंजूर होऊ शकले नाही, असा दावा केला आहे. त्यामुळे महिला आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष अधिक तीव्र झाला आहे.