तामिळनाडूत पर्यटकांचे वाहन दरीत कोसळून ९ ठार

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
वलपराई,
9 killed in accident in Tamil Nadu तामिळनाडूतील वलपराई परिसरात झालेल्या भीषण रस्ते अपघातात नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. घाटमाथ्यावरील धोकादायक वळणावर वाहनावरील ताबा सुटल्याने हे वाहन खोल दरीत कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील पेरिंथलमन्ना येथून आलेले पर्यटक या वाहनातून प्रवास करत होते. वलपराईहून परत जात असताना एका तीव्र वळणावर चालकाचा ताबा सुटला आणि वाहन घसरत खाली कोसळले. या अपघातात एका पुरुषासह आठ महिलांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तातडीने बाहेर काढून उपचारासाठी पोल्लाची येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
 

9 killed in accident in Tamil Nadu 
घाटमाथ्यावर उंची गाठण्यासाठी रस्ते वळणदार स्वरूपात बांधलेले असतात. अशा ठिकाणी अचानक वळण घेत पुन्हा सरळ दिशेत येणाऱ्या रचनेला हेअरपिन वळण असे म्हटले जाते. या वळणांवर वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी लागते, अन्यथा अपघाताचा धोका वाढतो. या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी या घटनेमुळे दुःख झाल्याचे सांगत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या तसेच जखमींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे केरळचे मुख्यमंत्री पिनारयी विजयन यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त करत जखमींना उत्तम वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले असून पीडित कुटुंबांना मदतीचे आश्वासन दिले आहे.