आ. विनोद अग्रवाल यांचे प्रयत्न ; ९० कोटी निधीतून होणार उभारणी
गोंदिया,
Approval for hostels जिल्ह्यातील दुर्गम भागांतून शिक्षणासाठी गोंदिया मुख्यालयात येणार्या आदिवासी, अनुसूचित जाति व ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना समाधानकारक वसतिगृह सुविधा उपलब्ध नसल्याने आ. विनोद अग्रवाल यांनी स्वतः पुढाकार घेऊन अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती आणि ओबीसी विद्यार्थ्यांसाठी अधिक क्षमतेची, सर्व सुविधा असलेली नवीन वसतिगृहासाठी शासनाकडे पाठपुरावा केला. याची फलश्रृती म्हणून शासनाकडून अनु. जाती प्रवर्गासाठी ७५० क्षमतेच्या तीन वसतिगृहांसाठी ९० कोटींची मंजुरी दिली आहे.
Approval for hostels शासनाने दिलेल्या मंजूरीनुसार ६० कोटी रुपयांच्या निधीतून अनु. जाती प्रवर्गातील मुलींसाठी ५०० मुलींच्या क्षमतेच्या दोन नवीन इमारती आरटीओ कार्यालयाजवळील जुन्या वसतिगृहाच्या जागेवर मंजूर करण्यात आल्या आहेत. लवकरच ही जुनी इमारत पाडून नवीन वसतिगृहाचे भूमिपूजन मंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात येणार आहे. याशिवाय मुलांसाठी २५० क्षमतेचे नवीन वसतिगृह मुर्री येथे उभारण्यात येणार असून काम लवकरच सुरू होणार आहे. प्रसंगी आ. अग्रवाल यांनी सांगितले की, ओबीसी वसतिगृहासाठीदेखील जागा मंजूर झाली असून कामकाज अंतिम टप्प्यात आहे. त्याचप्रमाणे अनु. जमाती प्रवर्गातील मुलामुलींसाठीच्या वसतीगृहासाठीही जागा मंजूर झाली असून ती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अनु. जमाती प्रवर्गासाठी १२५-१२५ मुली क्षमतेचे वसतिगृह कुडवा येथे दुग्ध प्रकल्पाच्या जागेवर उभारले जाणार असून याच परिसरात २५० व १२५ मुलांचे असे ३७५ क्षमतेचे वसतिगृह उभारण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, ओबीसी प्रवर्गासाठी कुडवा येथे मंजूर १००-१०० मुलांच्या वसतिगृहाला २५०-२५० क्षमतेपर्यंत वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही आ. अग्रवाल सांगितले.