भंडारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

आशुतोष पांडेची युपीएसीच्या "एनडीए" परीक्षेत देशात २८ वी रँक! महाराष्ट्रात दुसरा

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
भंडारा,
ashutosh pandey जिद्द, चिकाटी आणि देशसेवेची ओढ असेल तर कोणतीही गोष्ट साध्य करता येते, हे भंडारा शहराच्या आशुतोष प्रकाश पांडे याने सिद्ध केले आहे. भारतीय लोकसेवा आयोग म्हणजेच यूपीएससी तर्फे सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या 'राष्ट्रीय रक्षा अकादमी' म्हणजेच एनडीए परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, आशुतोषने अखिल भारतीय स्तरावर २८ वा क्रमांक (रँक ) पटकावून जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले आहे. विशेष म्हणजे हे यश त्याने पहिल्याच प्रयत्नात संपादन केले.
 
 
 
भंडारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
 
 
आशुतोषचे १० वी पर्यंतचे शिक्षण भंडारा येथील 'सनी स्प्रिंग डेल स्कूल' मध्ये झाले. 2014 मध्ये त्याने दहावी उत्तीर्ण केली. १० वीच्या परीक्षेत त्याने ९५ टक्के गुण मिळवून आपले शैक्षणिक वर्चस्व आधीच सिद्ध केले होते. त्यानंतर, सैन्य दलात अधिकारी होण्याचे स्वप्न उराशी बाळगून त्याने छत्रपती संभाजीनगर येथील अत्यंत प्रतिष्ठित अशा महाराष्ट्र शासनाच्या 'सैनिक पूर्व प्रशिक्षण संस्था' (एसपीआय) मध्ये कठीण प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करून प्रवेश मिळवला. ११ वी, १२ वी आणि एनडीए परीक्षेचे विशेष मार्गदर्शन त्याने याच संस्थे मधून पूर्ण केले. येथे घेतलेले परिश्रम, दिलेली मुलाखत या जोरावर आशुतोष याने पहिल्याच प्रयत्नात राष्ट्रीय रक्षा अकॅडमी ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि स्वतःला सिद्ध केले. पहिल्याच प्रयत्नात भारतीय लोकसेवा आयोगा द्वारा घेतल्या गेलेल्या एनडीए परीक्षेत उत्तीर्ण होत त्याने संपूर्ण देशात 28 क्रमांक मिळविला. तर महाराष्ट्रात तो दुसरा असून विदर्भातील एकमेव एनडीए उत्तीर्ण विद्यार्थी ठरला.ashutosh pandey या यशामुळे भारतीय सैन्यात थेट अधिकारी पदावर त्याची वर्णी लागली आहे.
 
भंडारा जिल्ह्यासारख्या भागात सहसा तरुण मुले मेडिकल किंवा आयआयटी सारख्या क्षेत्रांकडे वळताना दिसतात. सैन्य दलात अधिकारी होण्यासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन आणि पोषक वातावरणाची कमतरता असूनही, आशुतोषने देशसेवेचा कठीण मार्ग निवडला. त्याचे हे यश केवळ वैयक्तिक नसून जिल्ह्यातील इतर तरुणांसाठी मोठी प्रेरणा ठरणार आहे. संरक्षण क्षेत्रात अधिकारी होऊन देशाची सेवा करण्याच्या हेतूने आशुतोषने मिळवलेले हे यश कौतुकास्पद आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे कुटुंब, शिक्षक आणि सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भंडारा जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब असल्याचे बोलले जात आहे. सोबतच त्याचे हे यश इतरही तरुणांसाठी मार्गदर्शक असे आहे.
"देशसेवा हेच माझे पहिले उद्दिष्ट होते आणि त्यासाठी घेतलेल्या कष्टाचे आज चीज झाले आहे. 'SPI' मधील मार्गदर्शन आणि पालकांचा पाठिंबा यामुळेच मी हे यश संपादन करू शकलो."
आशुतोष प्रकाश पांडे