मोठा निर्णय! १२२ अभियंत्यांच्या बदल्या रद्द

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
मुंबई
BMC transfer मुंबई महापालिकेतील 122 अभियंत्यांच्या बदल्या अखेर रद्द करण्यात आल्या असून, या निर्णयामुळे प्रशासनातील बदली प्रक्रियेतील पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऑक्टोबर 2025 मध्ये करण्यात आलेल्या या बदल्या कथित गैरव्यवहार आणि ‘ट्रान्सफर मार्केट’च्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या.
 

BMC transfer  
मिळालेल्या माहितीनुसार, बदल्यांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी आणि आक्षेप नोंदवले गेल्यानंतर तसेच चौकशीच्या मागण्या वाढल्यानंतर ही संपूर्ण प्रक्रिया संशयाच्या कचाट्यात आली होती. त्यानंतर प्रशासनावर दबाव वाढत गेला आणि अखेर या बदल्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या प्रकरणाची गंभीर दखल महापौर रितू तावडे यांनी घेतली. त्यांनी संबंधित प्रकरणात तत्काळ कारवाईची मागणी केल्यानंतर हा विषय प्रशासनापर्यंत पोहोचला. पुढील चौकशी आणि आढाव्यासाठी प्रकरण अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे सोपवण्यात आले होते. त्यांच्या पातळीवर तपास झाल्यानंतर बदल्या रद्द करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला.या बदल्यांबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली तसेच भाजपचे शहराध्यक्ष अमित साटम यांनी गंभीर आरोप करत भ्रष्टाचाराची तक्रार दाखल केली होती. त्यांच्या आरोपांनंतर तत्कालीन आयुक्त भूषण गगराणी यांनी या बदल्यांना आधीच स्थगिती दिली होती. आता त्या बदल्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे बृहन्मुंबई BMC transfer  महानगरपालिका मधील प्रशासकीय प्रक्रियेवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे हा निर्णय गैरप्रकारांवर कारवाई म्हणून पाहिला जात असला, तरी दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल्या रद्द होणे हे प्रशासनातील अनियमिततेचे लक्षण असल्याची टीकाही होत आहे.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर भविष्यात बदली प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि स्वतंत्र समितीमार्फत राबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ‘ट्रान्सफर मार्केट’सारख्या आरोपांमुळे महापालिकेतील प्रशासन व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, या विषयावर राजकीय व प्रशासकीय पातळीवर पुढील घडामोडी अपेक्षित आहेत.