बालविवाह रोखा!

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
वेध
विजय कुळकर्णी
Child marriage भारतातील विकासाचा आलेख झपाट्याने उंचावत असताना, काही सामाजिक प्रश्न अजूनही आपल्या पायातील बेडी ठरत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बालविवाह. विज्ञान, शिक्षण, तंत्रज्ञान आणि कायद्याच्या प्रगतीच्या ही प्रथा अनेक भागात अजूनही जिवंत आहे, ही वस्तुस्थिती केवळ खेदजनकच नसून चिंताजनक आहे. बालविवाह हा केवळ एका कुटुंबाचा निर्णय नसतो. तो संपूर्ण समाजाच्या मानसिकतेचा आरसा असतो. एका बाजूला आपण ‘नवभारत’, ‘डिजिटल इंडिया’, ‘महिला सशक्तीकरण’ यासारख्या संकल्पनांचा गौरव करतो. दुसर्‍या बाजूला मुलींचे बालपण हिरावून घेणार्‍या प्रथांकडे दुर्लक्ष करतो. ग्रामीण आजही अनेक ठिकाणी मुलीच्या जन्मापासूनच तिच्या विवाहाची चिंता सुरू होते. शिक्षण, करीअर, स्वप्ने यापेक्षा विवाहाला अधिक महत्त्व दिले जाते. लवकर लग्न म्हणजे सुरक्षित भविष्य ही चुकीची धारणा अजूनही पक्की आहे. गरिबी, अशिक्षण आणि सामाजिक दबाव यांचा संगम यामुळे बालविवाहाला खतपाणी घातले जाते. पण, या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची आली आहे.
 
 
Child marriage
 
हा प्रश्न मुलींच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतो. लहान वयात गर्भधारणा झाल्यास मातृ मृत्यूचा धोका वाढतो. बालकांचे आरोग्य धोक्यात येते. दुसरे म्हणजे, शिक्षणाचा मार्ग बंद होतो. शिक्षण ही प्रगतीची गुरुकिल्ली असताना, बालविवाह मुलींच्या हातातून ती किल्ली काढून घेतो. याहूनही गंभीर बाब म्हणजे मानसिक परिणाम. बालवयातच जबाबदार्‍यांचा डोंगर उचलताना बालपण, स्वप्ने आणि आत्मविश्वास हरवतो. ती केवळ एक व्यक्ती म्हणून नव्हे, तर एक संपूर्ण पिढी म्हणून मागे पडते. २००६ चा बालविवाह प्रतिबंधक कायदा सांगतो की, अशा विवाहांना मान्यता नाही. परंतु, कायदे कागदावरच असतात. त्यांची खरी ताकद अंमलबजावणीत असते. दुर्दैवाने अनेक ठिकाणी ही अंमलबजावणी अपुरी पडते. सामाजिक दबाव आणि पारंपरिक कायद्यावर मात करतात. प्रश्न असा निर्माण होतो की, उपाय काय? सर्वप्रथम, शिक्षण हा सर्वात प्रभावी उपाय आहे. विशेषतः मुलींचे शिक्षण वाढविणे ही काळाची गरज आहे. शिक्षित मुलगी स्वतःचे आयुष्यच बदलत नाही तर, ती संपूर्ण कुटुंब आणि समाज घडवते. दुसरे म्हणजे, जनजागृती. समाजात बालविवाहाचे दुष्परिणाम स्पष्टपणे पोहोचविणे गरजेचे आहे. केवळ योजना किंवा घोषणांनी हा प्रश्न सुटणार नाही. समाजाच्या मानसिकतेत बदल आवश्यक आहे. तिसरे म्हणजे, आर्थिक सक्षमीकरण. गरीब कुटुंबांना आधार दिल्यास बालविवाहाची गरज कमी होऊ शकते. अनेकदा आर्थिक अडचणीमुळे पालक हा निर्णय घेतात.
 
 
 
Child marriage  माध्यमांची भूमिकाही येथे महत्त्वाची ठरते. वृत्तपत्रे, दूरदर्शन आणि सोशल मीडिया यांच्यामार्फत समाजाला जागृत करणे आवश्यक आहे. संपादकीय, चर्चासत्रे याद्वारे हा मुद्दा सतत जिवंत ठेवावा लागेल. तसेच स्थानिक प्रशासन, पोलिस आणि स्वयंसेवी संस्था यांनी अधिक सक्रिय भूमिका घ्यायला हवी. बालविवाह घडण्याआधीच तो थांबविणे ही खरी जबाबदारी आहे. परवा अकोला जिल्ह्यातील बाभुळगाव येथे जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या सतर्कतेमुळे होऊ घातलेला बालविवाह रोखण्यात आला. मुलीच्या पालकांकडून मुलीचा बालविवाह लावणार असे लेखी हमीपत्र घेण्यात आले. आजच्या युगात ‘महिला सशक्तीकरण’ हा शब्द केवळ घोषवाक्य म्हणून वापरण्यापेक्षा त्याचा खरा अर्थ समजून घेणे आवश्यक आहे. मुलींना शिक्षण, स्वातंत्र्य आणि संधी दिल्याशिवाय सशक्तीकरण शक्य नाही आणि हेच बालविवाहाच्या विरोधातील सर्वात मोठे शस्त्र आहे. आज मुली मुलांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावत आहेत. तर, केंद्र सरकारने महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव संसदेत पारित केला आहे. बालविवाह ही समस्या केवळ कायद्याने संपणार नाही; ती समाजाच्या सामूहिक प्रयत्नांनीच संपेल. प्रत्येक पालक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता आणि नागरिकाने याविरोधात ठाम भूमिका घेतली पाहिजे. शेवटी, एक गोष्ट स्पष्ट आहे, बालविवाह थांबविणे म्हणजे केवळ एका मुलीचे आयुष्य नाही तर देशाच्या भविष्यास सुरक्षित करणे आहे. त्याचबरोबर बालविवाह हे मुलींचे बालपण हिरावून घेते. कळी उमलण्याआधीच कुचकरली जाते. ज्या वयात ‘गुड टच बॅड टच’चे ज्ञान नसते, त्या वयात गर्भधारणासारख्या गंभीर बाबीला तिला सामोरे जावे लागते. तिची शारीरिक व मानसिक वाढ पूर्णत: न झाल्याने अल्पवयातच विविध व्याधी, आजार जडतात. अनेकदा अल्पवयीन मातांचा बाळंतपणाच्यावेळी दुर्दैैवी मृत्यूदेखील होतो. तिचा काहीही दोष नसताना तिला असह्य यातना सहन कराव्या लागतात. याचाच विचार करून शासनाने मुलगी १८ वर्षांची झाल्याशिवाय तिचा विवाह करण्यास कायद्याने बंदी घातली आहे. तेव्हा, पालकांनी या कायद्याचे स्वत:हून पालन केले पाहिजे. कायद्याचे पालन न करणारे पालक आपल्या मुलींच्या जीवित्वाशी खेळत आहेत. याचा विचार करून पालकांनी आपल्या मुलींचा विवाह तिचे वय १८ वर्षांचे पूर्ण झाल्यानंतरच करून द्यावा, असे आवाहन यानिमित्ताने करावेसे वाटते. 
 
८८०६००६१४९