नाशिक ते मुंबई प्रकरणात फडणवीसांची अ‍ॅक्शन!

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
मुंबई,
Fadnavis' action राज्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गृह विभागाची तातडीची बैठक घेऊन विविध संवेदनशील प्रकरणांचा सखोल आढावा घेतला. नाशिकमधील चर्चेत असलेले खरात प्रकरण, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी संबंधित धर्मांतराचा मुद्दा, तसेच परतवाडा आणि गोरेगाव येथील अमली पदार्थ प्रकरणांबाबत त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपशीलवार माहिती घेतली. या बैठकीस पोलीस महासंचालक, गृह विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि विशेष तपास पथकातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
 
fadnavis
 
खरात प्रकरणाबाबत बोलताना गृहमंत्र्यांनी पीडित महिलांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. या प्रकरणातील प्रत्येक पीडितेला विश्वासात घेऊन त्यांना न्याय मिळेल याची खात्री द्यावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई व्हावी यासाठी भक्कम पुरावे गोळा करण्यावर भर द्यावा, असे त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयात प्रकरण ठोसपणे मांडता येईल, यासाठी तपास अधिक मजबूत करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.नाशिकमधील धर्मांतराच्या प्रकरणाचीही त्यांनी गंभीर दखल घेतली. अशा प्रकारांना अजिबात स्थान दिले जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी पोलिसांनी स्वतःहून प्रकरण उघड केल्याबद्दल कौतुक केले. मात्र, पुढील तपास अधिक काटेकोर आणि सर्व बाजूंनी व्हावा, कोणताही पैलू दुर्लक्षित राहू नये, असे त्यांनी बजावले.
मुंबईतील गोरेगाव परिसरातील अमली पदार्थ प्रकरणावर भाष्य करताना त्यांनी अशा गुन्ह्यांविरोधात व्यापक मोहिमा राबवण्याचे आदेश दिले. तरुण पिढीच्या भवितव्याशी संबंधित असल्यामुळे या प्रकारांकडे अत्यंत गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.परतवाडा प्रकरणाबाबत त्यांनी पीडितांना पुढे येण्यासाठी प्रोत्साहन देण्यावर भर दिला. त्यांचे समुपदेशन करून त्यांना तक्रार नोंदवण्यासाठी विश्वास देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी समाजातील जाणकार व्यक्ती आणि कार्यकर्त्यांची मदत घेण्याचेही त्यांनी सूचित केले.