- शेतशिवारात आढळला शेतकऱ्याचा संशयास्पद मृतदेह
- गोरेगाव तालुक्यातील मलपूरी येथील घटना
गोंदिया,
शेतशिवारात गेलेल्या Farmer death suspicious शेतकऱ्याच्या मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आल्याची धक्कादायक घटना गोरेगाव तालुक्यातील मलपुरी गावात आज १८ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हुसेन सेवकराम रहांगडाले (५५) असे मृताचे नाव आहे. धारदार वस्तूचे मृताचा गळ्यावर व्रण असून सदर जखम दगळ की शस्त्रामुळे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तेव्हा ही घटना हत्या की अपघात अशा तर्कवितर्कांना उधाण आले आहे. घटनेची नोंद गोरेगाव पोलिसांनी केली असून सर्व बाजूंनी तपास सुरू करण्यात आला आहे.
Farmer death suspicious मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हुसेन रहांगडाले हे नेहमीप्रमाणे आज सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास आपल्या गुरांना घेऊन शेताकडे गेले होते. मात्र, काही वेळानंतर गावात अचानक त्यांच्या मृत्यूची बातमी पसरल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मलपुरी गावालगत असलेल्या नव्या तलावाच्या फरसावर त्यांचा मृतदेह गळा कापलेल्या अवस्थेत पडलेला आढळून आला. ही बाब समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. मृतदेहाची स्थिती संशयास्पद होती आणि त्यांच्या गळ्यावर जखमांचे स्पष्ट चिन्ह दिसून येत होते. या जखमा नेमक्या कशामुळे झाल्या, याबाबत सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. काहींच्या मते त्या जखमा धारदार शस्त्राने झालेल्या असाव्यात, तर काहींनी दगडावर पडल्यामुळे जखमा झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. या घटनेमुळे गावात विविध तर्कवितर्कांना उधाण आले असून, हत्या, आत्महत्या किंवा अपघात या तिन्ही शक्यतांवर चर्चा सुरू आहे. हुसेन रहांगडाले हे शांत स्वभावाचे व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थितीही साधारण असल्याने या घटनेमागील नेमके कारण काय असावे, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत काळे, पोलीस अधिकारी सुजित घोलप तसेच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले. तसेच घटनास्थळावरून काही महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले असून, त्याच्या आधारे तपासाची दिशा ठरवली जात आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या पोलिसांकडून सर्व शक्यता गृहित धरून तपास सुरू आहे.