गडचिरोलीतील विकास कामांच्या सर्व फाईल्स फास्टट्रॅकवर घ्या : मुख्य सचिव राजेश अग्रवाल

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
गडचिरोली,
chief secretary rajesh agarwal गडचिरोली जिल्ह्यातील विकास कामांशी संबंधित मंत्रालय स्तरावरील सर्व प्रलंबित फाईल्स फास्टट्रॅकवर घेऊन कामांना तातडीने गती देण्याचे स्पष्ट निर्देश राज्याचे मुख्य सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले. याचबरोबर वनहक्कधारक शेतकर्‍यांना तातडीने ‘फार्मर आयडी’ उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी निर्देश दिले.
 

chief secretary rajesh agarwal 
 
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी शुक्रवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे जिल्ह्यातील विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातून अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
 
बैठकीत जिल्ह्यातील शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये महसूल, खनिकर्म, राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, क्रीडा व आरोग्य विभाग आदी विविध विभागांकडून प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांचा समावेश होता. संबंधित विभागांनी या प्रस्तावांच्या पाठपुराव्यात गती आणावी, असे निर्देश मुख्य सचिवांनी दिले.
रिक्त पदांच्या विषयावर जिल्हा परिषद, बांधकाम, आरोग्य व इतर विभागांतील रिक्त पदे माहे मे अखेरपर्यंत जास्तीत जास्त भरण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच वनजमिनीचे पट्टे मिळालेल्या शेतकर्‍यांना तातडीने ‘फार्मर आयडी’ देऊन विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यावर विशेष भर देण्यात आला.chief secretary rajesh agarwal जिल्ह्यातील पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग व सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या रस्ते व पुलांच्या कामांना समन्वयातून गती देण्याचे निर्देश देण्यात आले.
 
अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी विकास कामांच्या पूर्ततेसाठी गडचिरोली जिल्ह्याच्या विशेष दौर्‍यावर असल्याचे सांगितले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील कामांची माहिती दिली. यावेळी मुख्य सचिव कार्यालयातून विविध विभागांचे अपर मुख्य सचिव व सचिव दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तर जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते.