गोंदियाच्या सावराटोली परिसरातील घटना : अनोख्या हत्याराचा वापर
गोंदिया,
दोन मित्रांवर लोखंडी रॉडला सायकलचा चैनपॉकीट लावून तयार करण्यात आलेल्या अनुकुचीदार हत्याराने जीवघेणा हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना १७ एप्रिल रोजी शहरातील सावराटोली परिसरात पहाटे ३ वाजताच्या सुमारास घडली. अमन उत्तम राऊत (२२), आयुष चित्रगुप्त अंबादे (२६) असे त्या गंभीर जखमी दोन्ही मित्रांचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अमन व आयुष हे दोघेही बसले असता आरोपी लक्की कांबळे (१९) प्रणय बागडे (२४), सुर्या डोंगरे (२५), प्रांजल राकेश चुटलेकर (२३) सर्व रा. सावराटोली यांनी आयुषने दिलेल्या शिवीगाळचा राग मनात ठेवून अमन वर हल्लाबोल करून त्याच्या डोका, कपाळ व चेहर्यावर सदर हत्याराने वार केले. यावेळी आयुष त्याला वाचविण्यासाठी आला असता त्याच हत्याराने त्याच्याही डोक्यावर वार केले. यात दोघेही गंभीर जखमी झाले. याप्रकरणी अमन उत्तम राऊत याच्या तक्रारीवरून गोंदिया शहर पोलिसांनी सर्व चारही आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद केला असून पुढील तपास पोलिस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक अक्षय चन्नावर करीत आहेत.