- महावितरणच्या कारभारामुळे वीज ग्राहकांमध्ये संताप
गोरेगाव,
Goregaon Mahavitaran मागील अनेक दिवसापासून परिसरात वारंवार होत असलेल्या वीजेच्या लपंडावामुळे सामान्य नागरिक त्रस्त झाले आहे. एकीकडे वीज ग्राहकांच्या घरी स्मार्ट मिटर बसवून महावितरण अपडेट होत असताना दुसरीकडे दरदिवशी किमान पाच ते सहा वेळा अर्धा ते एक तासासाठी वीज पुरवठा खंडीत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. यातही महावितरण कर्मचार्यांना याविषयी विचारणा केल्यास त्यांच्याकडून वीज ग्राहकांशीच असभ्य व्यवहार केले जात आहे. त्यामुळे महावितरणप्रति वीज ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.
Goregaon Mahavitaran गोरेगाव शहरासह परिसरातील घोटी, हलबीटोला, जानाटोला, गहेलाटोला, म्हसगाव, कटंगी आदी गावात वीज विभागाचा लहरीपणा जाणवत आहे. दिवसेंदिवस वीजेची कर आकारणी वाढत आहे. विविध प्रकारच्या करांनी सामान्य जनतेचे कंबरडे मोडत आहे. असे असताना सुध्दा वीजपुरवठा होत नाही, ही नित्याची बाब झाली आहे. वारंवार वीज पुरवठा खंडीत होत असल्याने शासकीय व निमशासीय कामाचा खोळंबा होत असून नागरिकांनाही उकाड्याचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे, दिवसभरातून तीन ते चार वेळा वीज पुरवठा खंडीत होत असताना रात्रीच्या सुमारासही बत्तीगुलचे प्रकार वाढले आहे. सद्या उन्हाळ्याचे दिवस असून उष्णतेचा पारा चढला आहे. त्यामुळे अंगाची लाई होत आहे. अशावेळी खंडीत वीज पुरवठ्यामुळे घरातील कुलर, पंखे शोभेची वस्तू ठरत आहेत. तर रात्रीही हीच परिस्थिती असल्याने महावितरणच्या या कारभारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे.