'या' जिल्ह्यांच्या हवामानात मोठा बदल

उन्हाच्या झळांपासून दिलासा मिळण्याची शक्यता

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
पुणे
IMD weather गेल्या काही दिवसांपासून कडाक्याच्या उन्हाने हैराण झालेल्या पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. शहरातील वाढते तापमान आणि तीव्र उकाडा लवकरच कमी होण्याची शक्यता असून, पुढील काही दिवसांत ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवला आहे.
 

IMD weather  
पुणे शहरात शुक्रवारी कमाल तापमान सुमारे ४० अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले, तर किमान तापमान १८.७ अंश सेल्सिअस इतके होते. सकाळपासूनच जाणवणाऱ्या उन्हाच्या तीव्रतेमुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवरील वर्दळ लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे चित्र दिसून आले. मात्र शनिवारी तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवसांत पुण्याच्या हवामानात महत्त्वपूर्ण बदल अपेक्षित आहेत. सोमवार ते बुधवार या कालावधीत म्हणजेच २० ते २२ एप्रिल दरम्यान शहरात आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. काही भागांत २ ते ३ मिमी पावसाची नोंद होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या पावसामुळे तापमानात घट होऊन वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र हा दिलासा तात्पुरता असणार असल्याचेही हवामान विभागाने सूचित केले आहे.दरम्यान, राज्यातील एकूण १४ जिल्ह्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील ठाणे, पालघर, रायगड, पुणे, अहिल्यानगर, सातारा आणि कोल्हापूर तसेच मराठवाडा व विदर्भातील बीड, जालना, परभणी, नांदेड, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे.या बदलत्या हवामानामुळे राज्यभरात तापमानात घट होण्याची शक्यता असून, नागरिकांना काही प्रमाणात उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.