वाघाला जेरबंद करण्याची मागणी
नागभीड,
Imprison the tiger तालुक्यातील मिंथूर परिसरात वाघ, वाघिण व पिल्ले असे एकूण 5 वाघ असून, त्यांचा नेहमीच शेतामध्ये वावर असतो. त्यामुळे शेतकरी पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाऊ शकत नसल्याने पिक नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वाघला त्वरित पकडावे किंवा शेतकर्यांना पिकांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करीत परिसरातील शेतकर्यांनी शुक्रवारी वनविभागाला घेराव घातला.
Imprison the tiger तालुक्यातील मिंथूर येथे 4 एप्रिल रोजी शेतामध्ये मोहफूल वेचताना हरिदास कुबडे या शेतकर्याला वाघाने ठार केले. वनविभागाच्या दुर्लक्षतेमुळे कुबडे यांचा जीव गेल्याचा आरोप करीत शुकवारी ज्या ठिकाणी वाघाने शेतकर्याला मारले त्याच ठिकाणी शेकडो शेतकर्यांनी एकत्र येऊन वनविभागाविरुद्ध रोष व्यक्त केला. कुबडे यांना ठार करण्याअगोदर 18 मार्चला कुमदेव म्हशाखेत्री यांच्या शेतात वाघ आढळला होता. तशी माहिती शेतकर्यांकडून वनविभागाला देण्यात आली होती. पण वनविभागाने दुर्लक्ष केल्याने एका शेतकर्यांचा जीव गेला असाही आरोप यावेळी शेतकर्यांनी केला. ज्या ठिकाणी कुबडे यांना वाघाने ठार केले त्या परिसरात कमीतकमी 150 हेक्टर जमीन आहे. त्या जमिनीमध्ये मका आणि धान पीक असून, वाघाच्या भितीने शेतकरी शेतात जाऊ शकत नाही. त्यामुळे हाती येणारे पिक नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वाघला त्वरित पकडावे किंवा शेतकर्यांना पिकांची नुकसान भरपाई द्यावी, मृतक शेतकरी हरिदास कुबडे याच्या कुटूंबाला त्वरित नुकसान देण्यात यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली. या आंदोलनात मिंडाला, मींथुर, नवेगाव, कोदेपार, खैरी चकचे शेकडो शेतकरी उपस्थित होते.