नवी मुंबई,
JNPT port blast नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) परिसरात शनिवारी दुपारी भीषण स्फोट होऊन केमिकल प्लांटमध्ये मोठी आग लागल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. जेडब्ल्यूआर लॉजिस्टिक पार्कमधील एका रासायनिक प्रकल्पात झालेल्या या स्फोटानंतर आगीने विक्राळ रूप धारण केले असून, धुराचे प्रचंड लोट अनेक किलोमीटर अंतरावरूनही दिसत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, संबंधित केमिकल प्लांटमध्ये अचानक झालेल्या स्फोटानंतर आग भडकली. त्यानंतर लागून असलेल्या इतर दोन प्लांटमध्येही स्फोट झाल्याने परिस्थिती अधिकच गंभीर झाली. सलग स्फोटांच्या आवाजाने परिसर दणाणून गेला आणि तेथे काम करणाऱ्या कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी धावाधाव करत परिसर सोडला.आगीची तीव्रता मोठी असल्याने तिचा विस्तार झपाट्याने होत असल्याचे दिसून आले. घटनास्थळाच्या मागील बाजूस डोंगराळ भाग असल्याने आग त्या दिशेने पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच आसपास इतर रासायनिक उद्योग मोठ्या प्रमाणावर असल्याने संभाव्य धोका अधिक वाढला आहे. घटनेची माहिती मिळताच सिडको, जेएनपीटी आणि स्थानिक अग्निशमन दलाच्या सुमारे सात ते आठ गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग आटोक्यात आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू असून अतिरिक्त मदतही पाचारण करण्यात आली आहे. आगीमुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, सायंकाळपर्यंत JNPT port blast या दुर्घटनेत जीवितहानी झाल्याची अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी काही जण अडकले किंवा जखमी झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. स्फोटाचे नेमके कारण काय, तसेच संबंधित प्लांटमध्ये कोणत्या प्रकारचे रसायन साठवले होते, याचा तपास प्रशासनाकडून सुरू करण्यात आला आहे.या घटनेमुळे जेएनपीटी परिसरातील औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, रासायनिक उद्योगांमध्ये आवश्यक सुरक्षाव्यवस्था काटेकोरपणे राबवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.