कारंजा (घाडगे),
karanja burglars arrested महिनाभरापासून कारंजा शहरात घरफोडी व चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी वार्ड निहाय रक्षक दल तयार करून रात्री गस्त घालण्यास सुरुवात केली होती. तर कारंजा पोलिसांनी चोरट्यांच्या गुन्हेगारांच्या मुसया आवळण्यासाठी विशेष मोहीम राबवली.
१७ रोजी पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना तीन संशयित इसम विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवरून बिहारी रस्त्याकडे जात असल्याची माहिती मिळताच नाकाबंदी करून त्यांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली; मात्र अंगझडतीदरम्यान घरफोडीसाठी वापरण्यात येणारे दोन लोखंडी रॉड मिळाल्याने त्यांच्यावर संशय बळावला.
कसून चौकशी केली असता आशिष उर्फ दसचक्का कुशवाह (२६), सूरज कुशवाह (२२) व एक अल्पवयीन अशी सांगितली. त्यांनी कारंजा येथे घरफोडी करण्याच्या उद्देशाने आल्याची कबुली दिली. १४ रोजी दुपारी बिहारी मार्गावरील एका घरी तर राजा भोज कॉलनी व जगदंबा कॉलनी येथेही घरफोड्या केल्याची कबुली दिली. तपासात आशिष कुशवाह याच्यावर नागपूर जिल्ह्यात २० ते २५ घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले असून तो यापूर्वी झाशी येथे दोन वर्षे हद्दपार होता. तर सूरज कुशवाह याच्यावर काटोल व मध्यप्रदेश येथे घरफोडीचे चार गुन्हे नोंद आहेत. पोलिसांनी आरोपींकडून दोन मोटरसायकल, घरफोडीचे साहित्य व दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे व उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रशेखर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रल्हाद मदन यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक सागर महिले, निलेश मंडरी, गजानन मरसकोल्हे, नितेश मैदपवार, अमोल मानमोडे, आशिष कालोकार, दिनेश घसाड, मंगेश मस्के, संदीप कावरे व समाधान पांडे यांचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी वार्डातील नागरिक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मदन यांना भेटण्यास गेले असता चोरट्यांना लवकरच गजाआड करण्यात यश येईल असे सांगितले होते. पोलिसांच्या या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशाच कठोर कारवाया सुरू ठेवाव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.karanja burglars arrested मदन यांनी ठाणेदार म्हणून पदभार स्वीकारल्यापासून सातत्याने गुन्हेगारीवर आळा घालण्याचे काम प्रभावीपणे केले आहे. अनेक सराईत गुन्हेगारांना अटक करून विविध गुन्ह्यांचा उलगडा करण्यात त्यांनी यश मिळवले आहे. भविष्यातही त्यांच्या नेतृत्वाखाली शहरात भयमुत वातावरण कायम राहील, अशी खात्री नगरपंचायत उपाध्यक्ष भगवान बुवाडे यांनी व्यत केली. आमच्या वार्डमध्ये भविष्यातही असेच पोलिस प्रशासनाचे सहकार्य लाभत राहावे, अशी अपेक्षा ग्रामरक्षक दल प्रमुख नरेश धोटे यांनी व्यत केली.