गुणतालिकेत तळाशी केकेआर; आता होणार उलथापालथ!

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
सद्याच्या हंगामात अत्यंत खराब कामगिरीमुळे कोलकाता नाईट रायडर्स संघात अस्वस्थता निर्माण झाली असून प्रशिक्षकपदाबाबत चर्चांना वेग आला आहे. संघाच्या भवितव्याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू असताना इंग्लंडचा माजी कर्णधार Kevin Pietersen यांनी एक धक्कादायक दावा करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या मते, ‘बॅझ’ म्हणून ओळखले जाणारे ब्रेंडन मॅककुलम पुढील हंगामात पुन्हा कोलकाता संघाचे मुख्य प्रशिक्षक बनू शकतात.मॅककुलम यांचा या संघासोबतचा पूर्वीचा प्रवास यशस्वी ठरला होता. त्यांनी २०२० ते २०२२ या कालावधीत संघाला मार्गदर्शन केले होते आणि त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने २०२१ मध्ये अंतिम फेरी गाठत प्रभावी कामगिरी केली होती. त्यांच्या आक्रमक आणि धाडसी दृष्टिकोनामुळे संघाला वेगळी ओळख मिळाली होती. त्यामुळे त्यांच्या संभाव्य पुनरागमनाच्या चर्चांनी चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
 

 points table 
 
मात्र सध्या मॅककुलम इंग्लंडच्या राष्ट्रीय संघाचे सर्व प्रकारांसाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांचा करार पुढील काही वर्षांसाठी असल्याने त्यांच्या परतीबाबत अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे हा दावा वास्तवात उतरतो की केवळ चर्चेपुरताच राहतो, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पीटरसन यांनी सामाजिक माध्यमावर केलेल्या वक्तव्यानंतर चाहत्यांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण या बदलाचे स्वागत करत असले तरी अनेकांना ही शक्यता अवघड वाटत आहे. दरम्यान, सध्या संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेले अभिषेक नायर यांच्यावरही टीकेची झोड उठली आहे. मागील वर्षी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र चालू हंगामात संघाची कामगिरी अत्यंत निराशाजनक ठरली आहे. कोलकाता संघाने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांपैकी बहुतेक सामने गमावले असून गुणतालिकेत तो तळाच्या स्थानावर घसरला आहे. अलीकडील सामन्यातही त्यांना पराभवाचा सामना करावा लागल्याने संघ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात संघ व्यवस्थापन कोणते निर्णय घेते, विशेषतः प्रशिक्षकपदाबाबत कोणता बदल केला जातो का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.