परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम १६३ लागु
गोंदिया,
MHT-CET Entrance Exam राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र व कृषी तंत्रज्ञान या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा-२०२६ ही प्रवेश परीक्षा ऑनलाईन पध्दतीने महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये २१ ते २६ एप्रिल या कालावधीत सकाळी ७.३० ते दुपारी १२.०० पर्यंत प्रथम सत्रात आणि दुपारी १२.३० ते सायंकाळी ६.४५ या वेळेत व्दितीय सत्रात घेण्यात येणार आहे. सदर परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ लागू करण्यात आले आहे.
MHT-CET Entrance Exam महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) अधिनियम २०१५ मधील तरतुदीनुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ चे शासकीय, शासन अनुदानित, अनुदानित अल्पसंख्यांक, खाजगी विना अनुदानित आणि विना अनुदानित अल्पसंख्यांक महाविद्यालयांचे प्रवेश राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत करण्यात येणार आहे. सदर परीक्षा प्रक्रिये दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचे दृष्टीने महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी खमारी ता.गोंदिया, शासकीय तंत्रनिकेतन गोरेगाव रोड फुलचूर पेठ गोंदिया, गोंदिया कॉलेज ऑफ फार्मसी चुलोद रोड पांगोली रोड गोंदिया, जे.एम. हायस्कूल न्यू लक्ष्मीनगर रेलटोली गोंदिया, वेदांत औद्योगिक प्रशिक्षण संस्था संत रवीदास वार्ड चंद्रभागा नाका तिरोडा, या परीक्षा केंद्रावर २१ ते २६ एप्रिल रोजी सकाळी ७.०० ते सायंकाळी ७.०० या वेळेत भारतीय नागरीक सुरक्षा संहिता चे कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन अतिरीक्त जिल्हादंडाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे यांनी परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात परीक्षा केंद्रावर परीक्षेदरम्यान कोणासही कसल्याही प्रकारचे अस्त्र, शस्त्र व कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे इत्यादींचा वापर किंवा जवळ बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. हा आदेश परीक्षेच्या कामावर नियुक्त असलेल्या अधिकारी/कर्मचारी यांना परीक्षा केंद्रावर प्रवेशासाठी लागु राहणार नाही.