आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दीक्षांत समारंभ
चंद्रपूर,
आज विज्ञान झपाट्याने पुढे जात आहे. आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या युगात स्वतःला सतत ‘अपडेट’ ठेवणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान डॉक्टरांची जागा घेऊ शकत नाही, पण तंत्रज्ञानाचा वापर करणारा डॉक्टर समाजाच्या निदान प्रक्रियेत मोठी प्रगती घडवू शकतो. वैद्यकीय पदवी म्हणजे केवळ कागदाचा तुकडा नाही, तर समाजातील आरोग्याची मोठी जबाबदारी आहे, असे प्रतिपादन MLA Sudhir Mungantiwar आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूरचा दीक्षांत समारंभ सैनिकी विद्यालयाच्या सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. यावेळी एमबीबीएस पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विधिवत पदवीदान करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले की, आजचा दिवस प्रत्येक विद्यार्थ्यासाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. वैद्यकीय क्षेत्रातील पदवी पूर्ण करणार्या विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांच्या चेहर्यावरचा आनंद पाहणे ही एक वेगळीच अनुभूती आहे. आपल्या कुटुंबातील वैद्यकीय परंपरेचा उल्लेख करीत ते म्हणाले, त्यांच्या परिवारात 13 डॉक्टर असून, वडील डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी 1960 साली एमबीबीएस पूर्ण केले. भाऊ नेत्ररोगतज्ञ, मुलगी व जावई रेडिओलॉजिस्ट असल्याचेही त्यांनी सांगितले. आणीबाणीच्या काळात वडील तुरुंगात असल्याने वैद्यकीय शिक्षण घेऊ शकलो नाही. मात्र, गोंडवाना विद्यापीठाने मानद डॉक्टरेट देऊन ‘डॉक्टर’ ही उपाधी दिल्याचा त्यांनी उल्लेख केला.
MLA Sudhir Mungantiwar चंद्रपूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालय व व कॅन्सर रुग्णालय उभारण्यात आपण योगदान दिल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्याचा मानस असल्याचे तसेच सैनिकी विद्यालयाच्या सभागृहासमोरील एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या 62 अभ्यासक्रमांच्या केंद्राचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते व्हावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही मुनगंटीवार यांनी नमूद केले. कार्यक्रमाला पद्मश्री माजी खासदार डॉ. विकास महात्मे, अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, डॉ. मंगेश गुलवाडे, उपअधिष्ठाता डॉ. शरद कुचेवार यांची प्रमुख उपस्थिती होती.